पुणे महानगरपालिका(पीएमसी) क्षेत्रामध्ये १५ जूनपर्यंत केवळ १७ टक्के नागरिकांचे लसीकरण केले गेले आहे. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) मध्ये हे प्रमाण ११ टक्के आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. पीएमसीमध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील केवळ दोन टक्के लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. तर, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १० टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र आहे.

“लसीकरणाची व्याप्ती ही अनेक घटकांवर अवलंबून असते. जर आपल्याकडे पुरेसा साठा असेल तर आपण पुणे जिल्ह्यात दररोज एक लाखांपर्यत लसीकरण करता येऊ शकते. आपल्याकडे केवळ पुणे शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पुरेशी केंद्रे आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी वेळेवर पुरेसा लस साठा आवश्यक आहे,” असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद म्हणाले.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कोविन पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध केली गेली नव्हती. नंतर ती चूक दुरुस्त केली गेली असून अद्यावत आकडेवारी पोर्टलवर टाकण्यात आली आहे.

समजून घ्या : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ कोणी घेऊ नये?, लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?

खासगी रुग्णालयांनी शहरी भागात लसीकरण सुरु केल्याने लसीकरणाची व्याप्ती वाढली आहे. आता सरकारी व खाजगी पुरवठ्याचे प्रमाण लसींसाठी निश्चित केले गेले आहे, आता आमच्याकडे अधिक साठा आहे आणि लवकरच १ लाखांच्या वर पोहोचण्याचा आमचा मानस आहे,” असे प्रसाद यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका(पीएमसी) क्षेत्रामध्ये पहिला लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. १०० टक्के फ्रंटलाइन कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे आणि ४५ ते ५९ वयोगटातील ७९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

त्याचप्रमाणे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लस घेण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, १८ ते ४४ वयोगटातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ५ टक्के आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही फक्त चार टक्के १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली,

महाराष्ट्रात घरोघरी लसीकरण: पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य

पुणे सहाय्यक संचालक (आरोग्य) डॉ संजय देशमुख यांनीदेखील यासंदर्भात माहिती दिली आहे. “पुणे जिल्ह्यातील लसींचा पुरवठा वाढल्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढणार आहे. गुरुवारी पुण्यात दुसर्‍या डोसच्या लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीचे सुमारे ७६,००० डोस मिळाले. तीन दिवसांपूर्वीच कोव्हिशिल्डचाही पुरवठा करण्यात आला आहे. दर तीन दिवसांनी, लसींचा साठा करण्यात येत आहे  जेणेकरून आम्ही मे महिन्यापेक्षा या महिन्यात जास्त लोकांचे लसीकरण करू शकू,”असे डॉ देशमुख म्हणाले.

मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ

“१५ जून रोजी पुणे जिल्ह्यात ६०,००० कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे १८०,००० डोस मिळाले आहेत. आम्हाला आणखी स्टॉक मिळत राहिल्यास पहिला आणि दुसरा डोस नागरिकांना देऊ शकतो” असे डॉ देशमुख यांनी सांगितले. जानेवारीमध्ये कोव्हिशिल्ड लसींचे डोस चार-सहा आठवड्यांच्या अंतरासह दिले जायचे. नंतर, केंद्राने त्याचा कालावधी चार ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवला. सरकारी पॅनेलने केलेल्या शिफारसीनंतर सध्या कोव्हिशिल्डचा दुसरा डोस डोस १२-१६ आठवड्यांच्या अंतरावर दिले जावेत अशी शिफारस केली होती. तथापि, कोव्हॅक्सिनच्या लसीच्या दुसऱ्या डोसच्या अंतरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.