आपण सर्वानीच पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. कारण पर्यावरण रक्षण केवळ माणसाचेच नाही तर मुक्या प्राण्यांसाठी देखील आवश्यक आहे.. हे मनोगत आहे पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दहावीत शिकणाऱ्या वैदेही रेड्डी हिचे.
चीन सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित तियानजिन आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत वैदेहीने यंदा प्रथम क्रमांकाचा ‘प्लॅटिनम अ‍ॅवॉर्ड’ प्राप्त केला आहे. या स्पर्धेची संकल्पना पर्यावरण, शांती आणि प्रेम ही होती.
या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना वैदेहीने तिची पर्यावरणाविषयीची कल्पना सांगितली आणि स्पर्धेचीही माहिती दिली. चीन सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत संपूर्ण जगातून ७१ देशांनी भाग घेतला होता. यामध्ये १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. चित्रकला स्पर्धेचा विषय ‘पर्यावरण, शांती आणि प्रेम’ असा होता, असे वैदेही म्हणाली.
या स्पर्धेथ वैदेहीने ‘वाघ वाचवा’ हा संदेश देणारी चित्रकृती साकारली. या विषयाचीच निवड का केली असे विचारल्यावर वैदेहीने सांगितले, ‘‘चीनमध्ये वाघांना औषधांसाठी मोठय़ा प्रमाणात मारले जाते. भारतीय वाघांची देखील विविध गोष्टींसाठी शिकार होते. हे पाहून मला फार वाईट वाटते. त्यातूनच मी वाघ वाचवा हा संदेश देणारे चित्र स्पर्धेसाठी तयार केले.’’ या संवेदनशीलतेमुळेच वैदेहीने वाघ वाचवा या संकल्पनेवर चित्र रेखाटले. ही स्पर्धा एक वर्षांपूर्वी (डिसेंबर २०१४) झाली होती. मात्र स्पर्धक लाखांच्या संख्येत सहभागी झाल्यामुळे स्पर्धेचा निकाल नुकताच लागला, अशी माहिती वैदेहीची आई गायत्री रेड्डी यांनी दिली. काझिरंगा येथे बघितलेल्या मृत वाघामुळे वैदेहीच्या मनात वाघांप्रति संवेदनशीलता जागी झाली, असेही त्यांनी सांगितले. हे पारितोषिक मिळवणारी वैदेही भारतातील एकमेव विद्यार्थी आहे. या आधी देखील वैदेहीने गूगल डूडल्स या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते.
वैदेहीच्या चित्रासह इतर विजेत्यांच्या कलाकृतीचे एका आर्ट अल्बममध्ये रुपांतर करून चिनी सरकारने हा आर्ट अल्बम जगातील इतर ७१ देशांच्या प्रमुखांना पाठविला आहे. तसेच चीनमधील सर्व राष्ट्रांच्या दूतावासांना हा आर्ट अल्बम पाठविण्यात आला आहे.