24 November 2020

News Flash

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे फळभाज्यांची आवक घटली

आले, काकडी, घेवडा, हिरवी मिरचीच्या दरात वाढ

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आले, काकडी, घेवडा, हिरवी मिरचीच्या दरात वाढ

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली. आले, काकडी, घेवडा, हिरवी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्य़ांनी वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून १५० ते १६० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. उन्हामुळे फळभाज्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. सिमला येथून दोनशे ते अडीचशे गोणी मटार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ ट्रक कोबी, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून लसूण साडेचार ते पाच हजार गोणी अशी आवक परराज्यातून झाली.

पुणे विभागातून सातारी आले चौदाशे ते पंधराशे गोणी, टोमॅटो पाच ते साडेपाच हजार गोणी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, गाजर दोनशे ते अडीचशे गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० पोती, पावटा २ ते ३ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो,  कांदा ७० ते ८० ट्रक , आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून मिळून बटाटा ४० ते ५० ट्रक अशी आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्या तेजीत 

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. कोथिंबिरेच्या एक लाख जुडीची आवक झाली. त्या तुलनेत मेथीची आवक कमी प्रमाणात झाली आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ५००-१८००,  मेथी- ५००-१०००, शेपू- ५००-८००, कांदापात- ५००-८००, चाकवत- ४००-६००, करडई- ४००-५००, पुदिना-१००-२५०, अंबाडी- ५००-६००, मुळा- ५००-१०००, राजगिरा-  ५००-६००, चुका- ५००-८००, चवळई- ३००-६००, पालक  ५००-६००

रसाळ फळांना मागणी

फळबाजारात फळांची आवक चांगली होत आहे. उन्हामुळे रसाळ फळांना मागणी आहे. खरबूज, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी या फळांचे दर टिकून आहेत. कलिंगडाची आवक घटल्याने किलोमागे कलिंगडाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत लिंबाचे दर गोणीमागे दोनशे रुपयांनी उतरले आहेत. पिवळ्या रसाळ लिंबांना चांगली मागणी आहे. फळबाजारात रविवारी अननस ७ ट्रक, मोसंबी ४० टन, संत्री १० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे ३ ते ५ हजार गोणी, चिक्कू एक हजार डाग, पेरू ६० केट्र्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो अशी फळबाजारात आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:40 am

Web Title: vegetable price hike in pune
Next Stories
1 मनोरुग्ण मुलाचा वृद्ध आईवर चाकू हल्ला; दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा
2 कुस्तीपटू राहुल आवारे ‘डीवायएसपी’ होणार; सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा
3 ‘काय आहे ते सरळ सांगावं रडीचा डाव आम्हाला पसंत नाही’; शरद पवारांनी काँग्रेसला सुनावले
Just Now!
X