चालू वर्षी एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदार संघांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत जेवढय़ा तक्रारी आल्या होत्या, त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींचे प्रमाण नगण्य राहिले. प्राप्त तक्रारींमध्ये माध्यमांमधून प्रशासनाला समजलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे, तर थेट प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

शहरासह जिल्ह्य़ात पार पडलेल्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की पिंपरी मतदार संघात बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याची तक्रार माध्यमांमधून प्रशासनाच्या निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते.  पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर संबंधित तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे निदर्शनास आले.

वडगाव शेरी मतदार संघातील एका मतदान केंद्रावर एका मतदाराने प्रत्यक्ष मतदान करताना चित्रीकरण केल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र, हा प्रकार पुण्यातच घडला किंवा कसे, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मनाई होती.

या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून हा प्रकार पुण्यात झाला असल्यास संबंधित निवडणूक निर्णय आणि विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मतदान केंद्रात गेल्यानंतर संबंधित मतदाराच्या नावे आधीच अन्य व्यक्तीने बनावट मतदान केल्याचा प्रकार पर्वती मतदार संघातील बिबवेवाडी भागात घडल्याची तक्रार आली आहे. मात्र, या ठिकाणी संबंधित खऱ्या मतदाराला निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रक्रिया पूर्ण करून मतदान करू देण्यात आले.

पावसामुळे अडचणी

शिवाजीनगर मतदार संघातील विद्याभवन स्कूल मतदान केंद्रात पहाटे चार वाजता शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन तास काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला. या दरम्यानच्या काळात मतदान केंद्रावर बॅटरी, मेणबत्ती अशा विविध माध्यमांतून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. परंतु, वीज नसल्याने मतदानाच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा आला नाही. याबरोबरच शहरासह जिल्ह्य़ातील विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रस्ते, वीजपुरवठा यांसह इतर अडचणी आल्या होत्या. प्रशासनाकडून रविवारी रात्रभर काम करून मतदान केंद्रे आणि त्यांच्याकडे येणारे मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेत पाच टक्के यंत्रे बंद

शहरासह जिल्ह्य़ात आठ हजार ईव्हीएमपैकी चाचणी मतदानाच्या वेळी २०४ आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ३६७ ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) बंद पडली. चाचणी मतदानावेळी १०० आणि चाचणी मतदान करताना ४७ कण्ट्रोल युनिट बंद पडली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ५५ आणि चाचणीच्या वेळी ४७ बॅलेट युनिट बंद पडली. शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि ग्रामीण भागात पुरंदरमध्ये मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार सर्वाधिक झाले. तसेच तीन दिवसांपासून झालेल्या पावसाने निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अनेक व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पेपर रोल बदलावे लागले.