लौकिकार्थाने शालेय शिक्षण नववीपर्यंतच झालेले. पण, त्यांनी केलेले ‘तीन दगडांची चूल’ हे लेखन हे तीन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपल्या लेखनाबरोबरच भटक्या विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्यां ही ओळख संपादन केलेल्या काम विमल मोरे या मंगळवारी (१९ ऑगस्ट) पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या नात्याने संवाद साधणार आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे मंगळवारपासून दोन दिवस रास्ता पेठ येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे पहिले विद्रोही स्त्री साहित्य संमेलन होत असून त्याच्या अध्यक्षपदी विमल मोरे यांची निवड करण्यात आली आहे. समता भूमी येथील महात्मा फुले वाडा येथून सकाळी दहा वाजता निघणारी ग्रंथिदडी संमेलनस्थळी पोहोचल्यानंतर केरळमधील ज्येष्ठ विचारवंत डॉ. मीरा वेलायुधन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिली.
मी मूळची गोंधळी समाजाची. भटक्या जमातीमध्ये असल्याने वारंवार फिरस्ता. त्यामुळे जेमतेम नववीपर्यंत शिक्षण. कुडमुडे जोशी समाजातील ‘गबाळ’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाह झाला. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. आपलंही जगणं शब्दबद्ध करावं या भूमिकेतून ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथन लिहिले. हे पुस्तक मुंबई, गुलबर्गा आणि गोंडवाना या तीन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे याचा आनंद जरूर आहे, अशा शब्दांत विमल मोरे यांनी आपली जीवनकथा उलगडली. या पुस्तकातील काही भाग डॉ. शर्मिला रेगे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केला असून हे लेखन आता हिंदीमध्येही अनुवादित होत आहे. ‘पालातील माणसं’ या पुस्तकामध्ये नंदीवाले, पारधी, डोंबारी, घिसाडी, वैदू, मांग-गारुडी अशा गावकुसाबाहेरच्या भटक्या समाजातील स्त्रियांचं जगणं मांडलं असल्याचेही त्यांनी सांगितले. या महिलांना मी माणूस आहे याचीच जाणीव नाही. शिक्षण नसल्याने हाताला काम नाही. जनगणना नसल्याने लोकसंख्या किती हे कोणीच सांगू शकत नाही. या महिलांकडे संशयाने पाहिले जाते. समाजामध्ये त्यांना धुण्या-भांडय़ाची कामे देखील मिळत नाहीत. जागतिकीकरणामध्ये या महिला परिघाबाहेर गेल्या असल्याचेही विमल मोरे यांनी सांगितले.