‘शिक्षकांच्या प्रश्नांमुळे गुणवत्तेवरच परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षकांना घडविण्याबरोबरच त्यांची प्रतिष्ठा उंचावणे आवश्यक आहे,’ असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार आणि त्यांचे विद्यार्थी व सहकारी डॉ. सतीश ठिगळे यांनी लिहिलेल्या ‘सर माझ्या चष्म्यातून’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तावडे बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, आमदार मेधा कुलकर्णी, प्रकाशक अभिजित वाळिंबे यावेळी उपस्थित होते.

यावेळी तावडे म्हणाले, ‘राज्यात १९ हजार शिक्षक अतिरिक्त असून त्यांच्या समायोजनाचे काम लवकरच पूर्ण होईल. एकही शिक्षक बेरोजगार राहणार नाही. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे काम सुरू आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणजे साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला.

दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यावर भर दिला जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासावर आधारित पदविका अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.’

नव्या विद्यापीठ कायद्याबाबत बोलताना तावडे म्हणाले, ‘डॉ. निगवेकर यांच्या समितीने तयार केलेल्या मसुद्यात विद्यापीठांच्या कुलगुरूंना शैक्षणिक स्वायत्तता देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

कुलगुरूंना निर्णयाचे स्वातंत्र्य असेल तरच गुणवत्ता टिकेल. कुलगुरूंना मंत्रालयात येण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यांच्याऐवजी कुलसचिवांची तीन महिन्यातून एकदा सह्य़ाद्रीवर बैठक होते.’

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘परदेशी विद्यापीठांबरोबर देशातील विद्यापीठांची तुलना करणे अयोग्य आहे. देशातील विद्यापीठांसाठी स्वतंत्र मॉडेल तयार केले पाहिजे. ब्रिटिशांनी तयार केलेल्या शिक्षणपद्धती फेकून भारतीय शिक्षणपद्धती आचरणात आणावी.’