शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यातर्फे विद्यार्थी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या परिषदेचे उद्घाटन होईल.
आमदार विनायक मेटे, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अविनाश महातेकर परिषदेसाठी उपस्थित राहतील. स्पर्धा परीक्षांमधील वयोमर्यादेच्या अटी शिथिल करणे, खासगी शिकवण्यांच्या शुल्कावर नियंत्रण आणणे, ग्रामीण भागातील व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शहरात वसतिगृहे तसेच मोफत शिक्षणाची सोय करणे अशा विविध मागण्या या वेळी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिवसंग्रामचे जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, अॅड. मंदार जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड. योगेश पांडे, रासपचे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे या वेळी उपस्थित होते.