राहुल खळदकर

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी शून्य अपघात (व्हिजन झीरो) योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत रस्ते अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले जाणार असून पादचारी मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या योजनेत जनजागृतीही केली जाणार आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ही योजना हाती घेतली आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील रस्ते अपघात कमी करण्याच्या विषयावर काम करत आहे.

द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या संस्थेकडून अपघातस्थळांचे शास्त्रीय विश्लेषण करण्यात येते. संस्थेने केलेल्या सूचनांनंतर अभियांत्रिकी उपाययोजना तसेच पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतात. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-४८) रस्ते अपघात कमी करण्यासाठी व्हिजन झीरो योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनने सहकार्य केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

या योजनेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. या प्रसंगी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महामार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

काय होणार ?

सेव्ह लाइफ फाउंडेशनचे पदाधिकारी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची पाहणी करणार आहेत. ज्या भागात अपघात घडतात, अशा भागांची पाहणी केल्यानंतर या भागात काही अभियांत्रिकी विषयक बदल करण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. रस्ता सोडून वाहन खड्डयात पडून होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कठडे (क्रॅश बॅरिअर) बसविण्यात येणार आहेत. महामार्गावर वाहनचालकांना वाहतूक विषयक सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. महामार्गाच्या कडेला एखाद्या ठिकाणी बेकायदा वाहने लावण्याचे प्रकार घडत असतील तर तेथे वाहने लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

मावळ तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या

कार्ला फाटा, वडगाव फाटा, तळेगाव, चाकण फाटा आणि सोमाटणे फाटा या भागात होणारी कोंडी सोडविणे तसेच अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावेत, असे निवेदन मावळ तालुक्यातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. तळेगाव ते लोणावळा दरम्यान झालेले बहुतांश अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी चाकणमार्गे येणारी अवजड वाहने तळेगाव येथील उर्से खिंडीतून द्रुतगती मार्गावर वळविण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर रस्त्याच्या कडेची पट्टी मातीची आहे.

पावसाळ्यात तेथे चिखल होतो. त्यामुळे ही पट्टी चांगली करण्याची गरज आहे. कामशेत येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. ते पूर्ण होणे गरजेचे आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे