News Flash

प्रभागाचे प्रगतिपुस्तक : धनकवडीमध्ये अपुरी स्वच्छतागृहे

महापालिका हद्दीत वीस वर्षांपूर्वी हा प्रभाग समाविष्ट झाला. दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते अशी या प्रभागाची ओळख आहे

वाहतूक कोंडीचे हे चित्र प्रभागात नेहमी पाहायला मिळते.

धनकवडी-आंबेगाव पठार

प्रभाग क्रमांक- ३९

भक्ती बिसुरे

दाट लोकवस्ती, अनधिकृत बांधकामे, अस्वच्छ परिसर अशा समस्यांमुळे त्रस्त असलेल्या महापालिके च्या धनकवडी-आंबेगाव पठार या प्रभाग क्रमांक ३९ मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हीच मोठी समस्या आहे. धनकवडी-आंबेगांव प्रभागात अवघी दोन स्वच्छतागृहे असून महिलांसाठी एकही स्वच्छतागृह प्रभागात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांअभावी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

महापालिका हद्दीत वीस वर्षांपूर्वी हा प्रभाग समाविष्ट झाला. दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते अशी या प्रभागाची ओळख आहे. किशोर धनकवडे, अश्विनी भागवत आणि विशाल तांबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून वर्षां तापकीर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आहेत. प्रभागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा दावा नगरसेवक करत असले तरी नागिरकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा अभाव येथे कायम आहे.

भौगोलिकदृष्टय़ा मोठय़ा असणाऱ्या या भागात अवघी दोन स्वच्छतागृहे आहेत. जी आहेत,त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. नवी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी जागेचा प्रश्न आहे. नगरसेवकांकडूनही स्वच्छतागृहांचा अभाव असल्याची कबुली देण्यात येते. या प्रभागात हीच मोठी समस्या आहे. महिलांसाठी तर एकही स्वच्छतागृह प्रभागात नाही.

अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी प्रभागात सातत्याने जाणवते. शहरी भाग म्हणून अत्यंत प्राथमिक समजल्या जाणाऱ्या भाजी मंडई, मुलांसाठी क्रीडांगणे, अशा कोणत्याही सुविधा या प्रभागात नाहीत. तशा तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत.  ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे नाहीत. मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात होणारी पूरसदृश परिस्थिती हा या भागातील नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरतो आहे. भाजी मंडई नसल्यामुळे रस्ते आणि पदपथांवर भाजी आणि अन्य विक्रे ते आपला पसारा मांडतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.

क्रीडांगण आणि क्रीडासंकु लाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे, मात्र ते पूर्ण करणे नगरसेवकांना शक्य झालेले नाही. अवैध दारुविक्रीचा त्रास नागरिकांना, विशेषत: महिलांना होतो, मात्र त्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मुख्य रस्त्यांवर सतत सुरू असलेल्या खोदकामांमुळे रस्त्याची नेहमी दुरवस्था असते.

नगरसेवकांचे दावे

* पाण्याच्या टाकीची कामे पूर्ण

* २४ तास समान पाणीपुरवठा

* क्रीडांगणे, क्रीडासंकु लांची उभारणी

* पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न

* शाळा इमारती बांधणीसाठी पाठपुरावा

नगरसेवक

* किशोर धनकवडे

* अश्विनी भागवत

* वर्षां तापकीर

* विशाल तांबे

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

धनकवडी गाव, फाईव्ह स्टार सोसायटी, सावरकर चौक, गणेश चौक, सूर्य चौक, वनराज कॉलनी, अनंतनगर सोसायटी, राऊत बागम्, जानुबाई मंदिर, लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन.

नागरिक म्हणतात

उद्यान, क्रीडांगण, अभ्यासिका या सुविधा नाहीत.

भाजी मंडई नाही. त्यामुळे करोना टाळेबंदी संपल्यावर भाजीवाले रस्त्यावर, पदपथांवर विक्रीसाठी बसतात. त्यामुळे वाहनांना अडथळा होतो. पाण्याचा प्रश्न मात्र बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात अद्यापतरी नगरसेवकांना यश आले आहें. त्यात सातत्य राहावे, ही अपेक्षा आहे.

आदित्य गायकवाड, अनंतनगर

अवैध दारुविक्री हा या भागातील मोठा प्रश्न आहे. प्रभागातील नगरसेवकांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि दमदार अशी अधिकाराची पदे भूषवल्यानंतरही प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

– विजय क्षीरसागर, धनकवडी.

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

वाहतूक कोंडी सारख्या समस्येचा नागरिक वर्षांनुवर्षे सामना करत आहेत. तरी देखील नगरसेवकांकडून त्यावर कोणताही उपाय केला जात नाही. नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्यांवर कचरा साचलेला असतो. साधा कचराच जिथे उचलला जात नाही तिथे स्वच्छतागृहे असण्याचा तर प्रश्नच येत नाही. बस थांब्याजवळ असणारे स्वच्छतागृह पुरते अस्वच्छ आहे.                – चंद्रकांत गोगावले, मनसे.

आनंद नगर टेलिफोन केंद्राकडून सव्‍‌र्हे क्रमांक ३१ कडे जाणाऱ्या पाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून एकाच ठिकाणी तब्बल ५५ चेंबर तयार करण्यात आली आहेत. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय केंद्राच्या ठिकाणी भाजी मंडईचे आरक्षण होते. त्या ठिकाणी हे केंद्र उभे राहिले, पण भाजी मंडईला पर्यायी जागा मिळाली नाही. त्यामुळे विक्रे ते विक्रीसाठी रस्त्यावर आले आहेत.                                    – गणेश भिंताडे, भाजप.

तक्रारींचा पाढा

* वाहतूक कोंडी, रस्ते दुरवस्था

* भाजी मंडई नाही

* अवैध दारुविक्री

* क्रीडांगणे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अभाव

* कचऱ्याचे साम्राज्य

लोकप्रतिनिधी म्हणतात

धनकवडी गावठाण आणि आंबेगाव पठार या भागातील प्राथमिक सोयीसुविधांचे काम नेहमीच प्राधान्याने करण्यात आले आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्परतेने मदत के ली जाते. तशा सूचना माझ्या कार्यालयातील सर्वाना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाही. धनकवडी परिसरातील शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मात्र कायदेशीर आणि तांत्रिक बाबींमुळे ते काम रखडले आहे. ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

– किशोर धनकवडे, राष्ट्रवादी

नगरसेवक म्हणून निवडून आले त्या दरम्यान आंबेगाव पठार हा नव्याने महापालिका हद्दीत तसेच प्रभागात आलेला भाग होता. त्यामुळे पायाभूत सुविधांचे अस्तित्वच नव्हते. त्यामुळे पहिली तीन वर्षे ठरवून त्या भागातील विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आज पाणी, वीज, रस्ते अशा सर्व पायाभूत सुविधा त्या परिसरात आहेत. उत्तमराव धनकवडे ९१ जी शाळा महापालिके ची शाळेची परिस्थिती बदलून तिचा चेहरामोहरा बदलण्यात आम्हाला यश आले आहे. त्या व्यतिरिक्तही शाळेचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करायचे आहे.

– अश्विनी भागवत, राष्ट्रवादी

धनकवडी सव्‍‌र्हे क्रमांक ३५ मध्ये खेळाचे मैदान, जलतरण तलाव, ओपन जिम असे एकत्रित क्रीडम संकुलाचे काम सुरू आहे. ते काही महिन्यात संपेल आणि वापरास योग्य होईल. पावसाळ्यात गृहनिर्माण संकुलांमध्ये पाणी साठण्याची समस्या उद्भवते, ती दूर करण्यासाठीही जुनी गटारे दुरुस्त करणे, स्वच्छता अशी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात नागरिकांना कमी उपद्रव होईल असा प्रयत्न आहे.

– वर्षां तापकीर, भाजप.

२०१२ पासून या परिसराचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे परिसराचा अधिकाधिक विकास हेच ध्येय ठेवून काम केले आहे. प्रभागाच्या परिसरात दोन स्वच्छतागृहे आहेत, मात्र ती पुरेशी नाहीत याची जाणीव आहे. त्यामुळे तिसरे स्वच्छतागृह उभे करण्यासाठी जागेचा शोध घेत आहोत. पाणीपुरवठा हा आमच्या प्रभागातील प्रश्न होता, कारण दर सोमवारी दुरुस्तीची कामे करण्यासाठी पाणी बंद असे. मात्र, करोना काळात तोही प्रश्न पूर्णपणे मार्गी लावला आहे.

– विशाल तांबे, राष्ट्रवादी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:14 am

Web Title: ward progress report in dhankawadi abn 97
Next Stories
1 वीजचोरांवर महावितरणचा बडगा
2 पंडितजींचा महिमा वर्णावा किती..
3 ‘इंडियन कॅन्सर जिनोम अ‍ॅटलास’ प्रकल्प सुरू
Just Now!
X