शासनाने ३१ डिसेंबपर्यंत स्थानिक संस्थाकर (एलबीटी) रद्द न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.
पुणे व्यापारी महासंघाची बैठक सोमवारी झाली. शासनाने स्थानिक संस्था कर रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा महासंघाने दिला आहे. त्यासाठी महासंघाने ३१ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. शासनाने स्थानिक संस्था कर दुसरा कोणताही पर्यायी कर न आकारता रद्द करावा, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, खजिनदार फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव हेमंत शहा आदी उपस्थित होते.
स्थानिक संस्था कराबाबत व्यापाऱ्यांच्या राज्यभरातील विविध संघटनांच्या बैठकीचे पुणे व्यापारी महासंघाने आयोजन केले असून ५ डिसेंबरला ही बैठक होणार आहे.