20 November 2019

News Flash

अदूरदर्शीपणा

पुणे शहरात आजवर कधीही नियमित पाणीकपात करावी लागली नाही

(संग्रहित छायाचित्र)

|| मुकुंद संगोराम

पुणे शहरात आजवर कधीही नियमित पाणीकपात करावी लागली नाही, याबद्दल सतत कौतुकाचे धनी होणाऱ्यांना याच आठवडय़ापासून मान खाली घालून राहावे लागणार आहे. सोमवारपासून पुण्याच्या मोठय़ा भागात आठवडय़ातून एक दिवस पाणी बंद करण्यास सुरुवात झाली आहे. याचा अर्थ, हेआता शहरभर सुरू होईल आणि पुणेकरांना पाणीटंचाई म्हणजे काय याची चुणूक अनुभवायला मिळेल. सध्या पुण्याला पाणी देऊ शकणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ तीन टीएमसी एवढेच पाणी आहे. हे सगळे पाणी वापरता येणारे नाही, कारण पावसाळा यंदा उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही धरणांमध्ये पुरेसे पाणी साठण्यास वेळ लागणार आहे. आठवडय़ातून एक दिवस पाणी बंदचा परिणाम म्हणून पुणेकर पाणी साठवण्यास सुरुवात करतील. म्हणजे त्यामुळे कदाचित जास्तच पाणी लागण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिका जलसंपदा खात्याकडून दरमहा दीड टीएमसी एवढे पाणी घेते. या पाण्याचा हिशोब मात्र जलसंपदा खात्याला सादर करीत नाही. याचे कारण हे पाणी पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच अधिक म्हणजे सुमारे अडीचपट एवढे आहे. याचा अर्थ पुण्यात पाण्याची फारच नासाडी होते, एवढाच होतो.

ही नासाडी पुणेकर करतात की महानगरपालिका, याचा शोध घेण्यासाठी पुण्याला मिळणाऱ्या पाण्याचा एकदा संपूर्ण हिशोब मांडायला हवा. तो मांडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडून सातत्याने होते आहे. पण सत्तेच्या जोरावर पुणे महानगरपालिका त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आली आहे. सध्याच्या लोकसंख्येलाच हे पाणी पुरत नाही, तर आणखी दहा वर्षांनी किती भीषण परिस्थिती ओढवेल, याची जराही काळजी पुण्याच्या कारभाऱ्यांना नाही. त्यांना पाच वर्षांचेही नियोजन करता येत नाही, हे तर अनेकदा सिद्ध झाले आहे. दहा-वीस वर्षांनंतर पुण्याची अवस्था काय असेल, याबद्दल ते कल्पनाही करू शकत नाहीत. आज पुण्यावर जे संकट घोंघावू लागले आहे. त्याचे कारणही हेच आहे.

गरजेपेक्षा कितीतरी अधिक पाणी घेऊनही ते शहरातील सर्व भागात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात महानगरपालिकेला अपयश आले आहे. हे शहरातील मध्यवर्ती भागांत आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या टँकर्सवरून सिद्धच झाले आहे. पालिकेतील जे अधिकारी कारभाऱ्यांना योग्य तो सल्ला देण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या तोंडाला पाने पुसून आपलेच खरे करण्याची सत्ताधाऱ्यांची खुमखुमी या पुणेकरांच्या जिवावर बेतण्याचीच शक्यता अधिक. निवडणूक आली म्हणून पाणीकपात होऊ न देणे, हे स्वार्थीपणाचे लक्षण. निवडणूक संपताच आपण केलेली पापे धुवून काढण्यासाठी पाणीकपातीचा अप्रिय निर्णय घेण्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देणे हे तर अधिकच भयंकर. दरवर्षी नेमेचि येणाऱ्या पावसामुळे पुढचे वर्ष निदान पिण्याच्या पाण्यापुरते तरी नीट जाईल, अशी केवळ प्रार्थना करून चालत नाही;त्यासाठी योग्य अशा नियोजनाची गरज असते.

सप्टेंबर महिन्यातच धरण साखळीत असलेले पाणी पुढील वर्षांच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत कसे पुरवता येईल, याचा विचार आजवर कधीच केला गेला नाही. निसर्गाच्या कृपेची वाट पाहात राहणे, ही अंधश्रद्धा झाली. त्यापेक्षा पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करून नागरिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्याची सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे अधिक आवश्यक. स्मार्ट सिटी अंतर्गत ते नियोजन करायचा चंग बांधला खरा, परंतु त्या फु ग्यातील हवा कधीचीच निघून गेली. दरवर्षी मे महिन्यात पाण्याची ही अशी अवस्था केवळ सत्ताधाऱ्यांच्या अदूरदर्शीपणामुळे येते, हे आपण सर्वानी पक्के लक्षात ठेवायला हवे. पुण्याची लोकसंख्या कधीतरी एक कोटीच्या आसपास जाईल, तेव्हा पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पाणी पुरणार नाहीच. ते पुरवायचे असेल, तर त्याची तयारी आत्तापासून करायला हवी. पणे एवढे शहाणपण कारभाऱ्यांना कधी बरे येईल?

First Published on June 11, 2019 12:46 am

Web Title: water scarcity 12
Just Now!
X