येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्युट भारत सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे अशी माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिलं. या लशीचं वितरण हे सुरुवातीला भारतातच केलं जाईल. त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच अफ्रिकेतील देशांमध्ये लशीचं वितरण केलं जाईल असंही अदर पुनावालांनी स्पष्ट केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिरम इन्सिट्युटला भेट दिली. यानंतर सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. सिरममधल्या शास्त्रज्ञांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे सव्वा तास चर्चा केली.

सिरम इन्सिट्युटमध्ये ज्या लशीची निर्मिती केली जाते आहे ती लस चांगली आहे.ही लस घेतलेल्या व्यक्तीला करोना झाला तर रुग्णालयात दाखल करावं लागणार नाही. तसेच करोनाचा प्रसार ६० टक्क्यांपर्यंत कमी करता येणार आहे. असा विश्वास यावेळी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.