पुणे शहरात वाढत्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवाजीनगरमधील जम्बो कोविड सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे. सध्या या सेंटरमधील ५५ बेड सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मात्र पुणेकरांनी सर्व नियमांचे पालन करावे असं आवाहनही महापौरांनी केलं आहे. पुणेकरांनी नियमांचे पालन केलं नाही तर भविष्यात आणखी कडक निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशाराही महापौरांनी दिलाय.

शिवाजीनगर येथील सीईओपो महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर यापुढील काळात कशाप्रकारे सेंटरचे नियोजन असणार आहे, याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

“पुणे शहरात सुरुवातीच्या काळात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत होते. तेव्हा आपण जम्बो कोविड सेंटर उभारले होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी रुग्ण संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा रुग्ण संख्या अधिक प्रमाणात आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून कोविड सेंटर सुरू करीत असून आठवड्याभरात ५०० बेड सेवेसाठी असणार आहेत,” असं महापौरांनी यावेळी बोलताना सांगितलं. या सेंटरमधील ५०० पैकी  २५० ऑक्सिजन बेड, २०० सीसी बेड आणि ५० आयसीयू बेड असणार आहेत, असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे. या सेंटरची क्षमता ८०० बेड्सची असल्याचं हे सेंटर सुरु करण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलेलं. आजपासून या सेंटरमधील ५५ बेड सुरु करण्यात आले असून आठवडाभरात ही संख्या ५०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.