News Flash

“हलगर्जीपणा करु नका; लोकांचे जीव वाचवण्यासाठी साखळी तोडणं गरजेचं”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नागरिकांना कळकळीचं आवाहन

फाइल फोटो (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)

“प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. करोनाची साखळी तोडली, तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्या, असं कळकळीचं आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे झालेल्या बैठकीत केलं.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘करोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ पार पडली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. ही बाब चिंतेची असून, करोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणं आवश्यक आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडिट प्राधान्यानं करून घेण्यात यावं. प्रशासनानं याबाबत खबरदारी घ्यावी,” अशी सूचना पवार यांनी केली.

आणखी वाचा- “संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!

“सांगली जिल्ह्यात मोबाईल करोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची करोनाची तपासणी केली जाते. त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅनद्वारे करोना तपासणी करण्यात यावी. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तत्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावेत. बारामती तालुक्यातील वृद्धाश्रमांमध्ये जावून तेथील वृद्धांची व कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात यावी. आरोग्यसेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनानं कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे. जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील पदाधिकारी, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आयुष प्रसाद म्हणाले, “ज्या भागामध्ये करोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खासगी रूग्णालयांमधून करार पद्धतीनं मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आलं आहे. करोना रूग्णांचे एक्स-रे करणं आवश्यक आहे. औषधांची कमतरता भासू देणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. जिल्हा परिषदेने बेड मॅनेजमेंटसाठी ॲप तयार केले आहे त्याचा वापर करावा. सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. शाळांमध्ये कॉरंटाईन सेंटर चालू करण्यात यावेत,” इत्यादी सूचना त्यांनी यावेळी केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 2:29 pm

Web Title: weekend lockdown ajit pawar appeal to people for follow new guidelines bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा लांबणीवर
2 राज्यात पावसासह गारपिटीचाही इशारा
3 नववी, अकरावीच्या मूल्यमापन निर्णयाबाबत संमिश्र सूर
Just Now!
X