अविनाश कवठेकर

शहरात ‘स्मार्ट’ थांबे, दिशादर्शक आणि ई-स्वच्छतागृहे

औंध-बाणेर-बालेवाडी या भागाबरोबरच संपूर्ण शहरासाठी ई-कॉरीडॉर करण्याचा निर्णय पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीसीसीडीसीएल) कंपनीने घेतला आहे. त्याअंतर्गत स्मार्ट बसथांबे, बस, ई-टॉयलेट्स, स्मार्ट खांब, स्मार्ट दिशादर्शक उभारण्यात येणार असून नियोजित ई-बाइकसाठी चार्जिग पॉइंटही प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील स्मार्ट बसथांबे आणि ई-टॉयलटेच्या रूपाने ई-कॉरीडॉरला गती देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. वाय-फायच्या माध्यमातून ई-कनेटिव्हिटी साधण्याचा प्रयत्न ई-कॉरीडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पीएमपीसाठी एक हजार बसथांबे, ५०० ई-टॉयलेट, दोन हजार स्मार्ट पोल, ५०० स्मार्ट कचरा पेटय़ा (डस्ट बिन) येत्या काही दिवसांत स्मार्ट सिटीकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. विविध प्रकारची देयके भरण्यासाठी किऑक्स सेंटरची उभारणीही या अंतर्गत प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळापुढे तसा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर ई-कॉरीडॉरच्या प्रक्रियेला आणखी गती मिळणार आहे.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या भागापुरताच प्रारंभी हा प्रकल्प मर्यादित होता. मात्र आता तो संपूर्ण शहरासाठी राबविण्यात येणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशिप या तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून यापैकी ई-टॉयलेट आणि बसथांबे उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ई-टॉयलेटवर सोलर पॅनल उभारण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, ऑटो फ्लशिंग अशा सुविधा देण्यात येणार आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि उत्कृष्ट दर्जाची स्वच्छतागृहे याअंतर्गत उभारण्यात येणार आहे.

विविध सुविधांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे. बसचे वेळापत्रक, बसथांब्यात प्रवाशांना मोबाइल चार्जिगची सुविधा, पुरेशी जागा असेल, तर ई-किऑक्सची उभारणीही करण्यात येणार आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची परवानगी घेतल्यानंतरच या प्रकारच्या बसथांब्याच्या उभारणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात दोन हजार स्मार्ट पोलही उभारण्याचे नियोजित आहे. या पोलवर सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक फलक असणार आहेत. मोबाइल चार्जिगसाठीची सुविधाही चौका-चौकात देण्यात येणार असून ई-बाइकसाठी चार्जिग पॉइंट असतील. शहरातील तीन हजार खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

बसथांब्यांवर वाय-फाय सुविधा

स्मार्ट सिटीकडून काही महिन्यांपूर्वी नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी १९९ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्याचा मोठा वापर नागरिकांकडून झाला होता. त्यामुळे वाय-फायच्या माध्यमातून ई-कनेटिव्हिटी कशी करता येईल, याचे नियोजन स्मार्ट सिटीकडून सुरू करण्यात आले. त्यातून ई-कॉरीडॉर ही संकल्पना पुढे आली. एकाच खांबावर विविध घटकांचा समावेश करण्याबरोबरच बसथांब्यांवर वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

औंध-बाणेर-बालेवाडीत प्रायोगिक तत्तावर ई-कॉरीडॉर

ई-कॉरीडॉरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याला कंपन्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून औंध-बाणेर-बालेवाडी या भागात प्रायोगिक तत्त्वावर ई-कॉरीडॉरची अंमलबजावणी होणार आहे. मार्चपर्यंत या भागात ई-कॉरीडॉरची अंमलबजावणी झाल्यानंतर जून महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.