खासगी, व्यावसायिक किंवा धर्मादाय संस्थांनी चालविलेली अनेक ग्रंथालये विविध ठिकाणी असतात. ग्रंथालयांची वाटचाल डिजिटायझेशनकडे होते आहे. त्यानुसार शहरातील ग्रंथालये देखील डिजिटल होत आहेत. अशा एका डिजिटल ग्रंथालयाविषयी..

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक नावाजलेली आणि नामांकित ग्रंथालये आहेत. परंतु बदलत्या काळाची गरज पाहता आणि आजकालच्या तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून नव्याने काही ग्रंथालये स्थापन होत आहेत. पुणे शहरातील गांजवे चौकात असलेले प्रभु ज्ञान मंदिर हे ग्रंथालय अवघ्या काही दिवसांतच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. मीना प्रभु यांनी आपल्या नातवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ग्रंथालय सुरू केले. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, वाचनाची गोडी लागावी  हा या मागचा हेतू आहे. हे ग्रंथालय सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत सुरू असते.

सध्या ग्रंथालयात ललित, ऐतिहासिक, विज्ञान, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी आठ ते नऊ हजार पुस्तके, मासिके, पाक्षिके, वृत्तपत्रे ग्रंथालयात आहे. तसेच डिजिटल स्वरूपात म्हणजे किंडल वर पंधरा लाख पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहे. हे किंडल सभासद वाचकांसाठी असून इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांतील विविध विषयांवरील आवडीची पुस्तके सहज वाचता येतात. ग्रंथालयातील प्रत्येक वाचकाची नोंद ठेवली जाते. ग्रंथालयात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक वाचकाला बायोमॅट्रिक नोंदणी असून सभासद असलेल्या विद्यार्थ्यांलाच फक्त ग्रंथालयात प्रवेश करता येतो.

अभ्यास करण्यासाठी नि:शब्द शांतता आणि पोषक वातावरण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. वाचकांना कोणताही अडथळ्याविना वाचन करता यावे यासाठी अनेक सोयी-सुविधा ग्रंथालयात करण्यात आलेल्या आहेत. ग्रंथालयात काही विद्यार्थी दिवसभर असतात. तेव्हा अभ्यासातील कंटाळा दूर करण्यासाठी येथील खुर्ची, टेबलापासून भिंतीच्या रंगसंगतीचा विचार करण्यात आला आहे.  शहरातील हे अद्ययावत ग्रंथालय असून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहे. अभ्यासविषयक चर्चासांठी वेगळी जागा, वाहनतळ, भोजनालय, संगणकावरून अभ्यासासाठी माहिती घेण्यासाठीचा वेगळा कक्ष, एखादे व्याख्यान पाहायचे असल्यास इतरांना त्रास न होता आणि एकाग्रतेने संबंधित विद्यार्थ्यांलाच ते पाहता यावे याची सोय देखील येथे आहे. ग्रंथालयातर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. ही व्याख्याने विनामूल्य असून सर्वासाठी खुली असतात. ग्रंथालयाचा सभासद होण्यासाठी ठरावीक शुल्क आकारण्यात येते.

ग्रंथालयाचा पत्ता

प्रभु ज्ञानमंदिर, एस.एम.जोशी सभागृहाशेजारी, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, निवारा समोर चौथा मजला, नवी पेठ पुणे-४११०३०.