प्रधानमंत्री आवास योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा बिलकूल विरोध नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमासाठी सन्मानाने आमंत्रित करावे, एवढीच आमची भूमिका असल्याचे शहर राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शहरविकास योगदान काय, असा मुद्दाही राष्ट्रवादीने उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी, सदनिका सोडतीवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

वाघेरे म्हणाले की, सोडतीच्या कार्यक्रमात अर्जदार नागरिकांची आम्ही अडवणूक केली नाही. नाटय़गृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फक्त घोषणाबाजी केली. सदनिका मिळवून देण्यासाठी काही दलाल फिरत आहेत. ठरावीक रक्कम द्या, तुम्हाला घरे मिळतील, असे ते सांगत आहेत. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, आयुक्तांनी अद्याप कारवाई केलेली नाही.

राजू मिसाळ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे शहरविकास काहीही योगदान नाही. त्यांच्या हस्ते सोडत काढण्याचे कारण नाही. राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने सोडतीचा कार्यक्रम रद्द करावा लागला, असे असताना भाजपने राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. रावेत प्रकल्पाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने तेथील सोडत काढण्यात येऊ नये.