कांद्याच्या भाववाढीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर बिघडलेले घरखर्चाचे गणित रूळावर येत असताना आता गव्हाच्या दरांनी उसळी घेतली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात गव्हाच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पंजाबपाठोपाठ गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेशात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे गव्हाचे पीक नासले आणि गव्हाचा हंगामही महिनाभर लांबणीवर पडला. परिणामी बाजारात साठवणुकीतील गहू विक्रीस आणला जात आहे. मध्यप्रदेशातील गव्हाची आवक फेब्रुवारी सुरू होणार असल्याने तूर्तास महाग गव्हावर निभावून न्यावा लागणार आहे.

पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात गव्हाचे मोठे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घेतले जात असले तरी या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन कमी आहे. पंजाबमधील गहू उत्तरेकडील राज्यांत तसेच पंजाबमध्ये मोठय़ा प्रमाणावर विकला जातो. देशाच्या उर्वरित भागांत मध्य प्रदेशातील गहू विक्रीसाठी पाठविला जातो. मध्य प्रदेशातील गहू लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर संपल्यानंतरही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस झाला. अवकाळीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले तसेच प्रतवारीवर परिणाम झाला. सध्या बाजारात असलेला गहू साठवणुकीतील असून शासकीय योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी गहू खरेदी केला आहे. या गव्हावर प्रक्रिया करून तो विक्रीस पाठविला जात आहे. प्रक्रिया केलेल्या गव्हाच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील गव्हाचे व्यापारी विजय नहार यांनी दिली. गुजरात आणि मध्य प्रदेशातील गव्हाचे साठे संपत चालले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील हंगामाची तयारी..

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानुसार यंदाच्या रब्बी मोसमात ३३०.२० लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाचे पीक घेण्यात येणार आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत (२९६.९८ लाख हेक्टर) ३३.२३ लाख हेक्टरने जास्त आहे तर १९५०-५१ पासूनचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यापूर्वी २०१४-१५ मध्ये गव्हाचे पीक ३१४.७० लाख हेक्टर क्षेत्रात घेण्यात आले होते. मध्य प्रदेश (१९.०७ लाख हेक्टर), गुजरात (५.६१ लाख हेक्टर) राजस्थान (४.४९ लाख हेक्टर), महाराष्ट्र (३.८६ लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (०.७४ लाख हेक्टर), झारखंड (०.५० लाख हेक्टर), कर्नाटक (०.४९० लाख हेक्टर) आणि हिमाचल प्रदेश (०.४० लाख हेक्टर ) क्षेत्रात गव्हाचे पीक घेण्यात येणार आहे, असे मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

पोषक वातावरणाचा अभाव!

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यात गव्हाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. गव्हाची लागवड होण्यासाठी थंडी लागते. पावसामुळे गव्हाच्या लागवडीवर परिणाम झाला. गव्हाचा हंगाम मार्चनंतर सुरू होतो. मध्य प्रदेशातील गव्हाला अवकाळीचा फटका बसल्याने तेथील गव्हाची आवक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होईल. गुजरातधील गव्हाची आवक १५ फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी विजय नहार यांनी सांगितले.

गव्हाचे घाऊक दर (प्रति क्विंटल)

* लोकवन- २९५० ते ३५०० रुपये

* मध्य प्रदेश तुकडी (१५४४ जात)- ३२०० ते ३४०० रुपये

* महाराष्ट्र तुकडी- ३००० रुपये क्विंटल