किसन राठोड याचे कात्रज घाटातील डोंगर फोडण्याचे उद्योग सुरू असताना त्याच्यावर २०११ साली पुण्याचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी आर. के. गायकवाड यांची मेहेरनजर असल्याचे ‘लोकसत्ता’ ला मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. गायकवाड यांनी प्रशासनाच्या नेहमीच्या कार्यपद्धतीत बदल करून राठोड याच्या प्रकरणाची सुनावणी आपल्याकडे घेतली. त्याचबरोबर त्याला दोनदा डोंगर फोडून तेथील गौण खनिज काढण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे, त्या वेळी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी नाकारली होती. त्यामुळे गायकवाड यांची राठोडवर ‘मेहेरनजर’ कशासाठी होती, असा प्रश्न विचारला जात आहे.
डोंगर फोडणे, नाले बुजवणे, खनिज चोरणे या आरोपांवरून गुन्हे दाखल असलेला राठोड याने अनेक पोलीस अधिकाऱ्यांना जमिनी मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले. त्याला त्या वेळी अपर जिल्हाधिकारी असलेले गायकवाड यांनी मदत केल्याचे उघड झाले आहे. राठोड याने कात्रज घाटातील शिंदेवाडी (११२अ) येथील डोंगर फोडण्याचे उद्योग सुरू केले, तेव्हा त्या गावच्या तलाठय़ांनी २९ डिसेंबर २०१० रोजी त्याच्या या कामाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला. तो हे कृत्य बेकायदेशीरपणे करत असल्याचा अहवाल तहसिलदारांना पाठवला. त्याच्या या कामांमुळे दगड सुटे होऊन रस्त्यावरील वाहतुकीला, नव्या बोगद्याला आणि त्यासाठी बांधलेल्या वीजगृहाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यात म्हटले होते. हे सुरू असतानाच राठोड याने २५० ब्रास गौणखनिज (मुरूम, माती) काढण्याची परवानगी मागितली. ती खनिकर्म शाखेचे प्रमुख म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशांद्वारे देण्यातही आली. त्यासाठी राठोडकडून ५६,३०३ रुपये भरूनही घेण्यात आले. त्या वेळी आर.के.गायकवाड हे अपर जिल्हाधिकारी होते.
त्यानंतर पुन्हा राठोड याला त्याच जागेवरील डोंगर फोडून २०० ब्रास गौण खनिज काढण्यासाठी १५ एप्रिल २०११ रोजी परवानगी देण्यात आली. तीसुद्धा अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशांद्वारे देण्यात आली. त्या वेळीसुद्धा गायकवाड हेच अपर जिल्हाधिकारी होते. या वेळी त्याच्याकडून ५४,४४८ रुपयांची रक्कम जमा करून घेण्यात आली.
कार्यपद्धतीनुसार १०० ब्रासपर्यंत गौण खनिज काढण्याची परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत, १००० ब्रासपर्यंत खनिज काढण्याची परवानगी देण्याचे अधिकार प्रांत अधिकाऱ्यांकडे असतात. त्यापेक्षा जास्त खनिज काढायचे असेल तर ते अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. मात्र, या दोन्ही प्रकरणांत १००० ब्रासपेक्षा कमी खनिज काढण्यासाठी गायकवाड यांनी स्वत: आदेश दिले.
याशिवाय राठोड याने खनिज काढल्याबद्दल त्याला तहसिलदारांनी दंड आकारला होता. कार्यपद्धतीनुसार त्याची सुनावणी प्रांत अधिकाऱ्यांकडे जाणे अपेक्षित होते. मात्र, गायकवाड यांनी ही सुनावणी स्वत:कडे दाखल करून घेतली आणि त्याच्याकडून दंड वसूल करण्यास स्थगिती दिली. हे आदेश त्यांनी २७ जून २०११ रोजी दिले होते. राठोड याच्यावर गायकवाड यांची ही मेहेरनजर कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.

राठोड कुटुंबाकडे २०३ एकर जमीन
किसन राठोड, त्याचा भाऊ पंडित आणि पत्नी सुशालिनी यांच्याकडे पुणे जिल्ह्य़ात मिळून एकूण सुमारे २०३ एकर जमीन असल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत उघड झाले आहे. या तिघांच्या नावावर शिंदेवाडी, राठवडे, वांगणी, तांभाड, मादगुडेवाडी, आरवी, आंबेगाव-बुद्रुक अशा गावांमध्ये ही जमीन आहे. किसनच्या नावावर ३५ हेक्टर१४ आर (८७ एकर ३४ गुंठे), पंडित याच्या नावावर ३६ हेक्टर ५६ आर (९१ एकर १६ गुंठे) आणि किसनची पत्नी सुशालिनी यांच्या नावावर ९ हेक्टर ५७ आर (२३ एकर ३७ गुंठे) जमीन असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.