पुणे : राज्याच्या आरोग्य विभागात अनेक महत्त्वाची, खास करून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर सर्वसामान्य रुग्णांसाठी त्या आरोग्य सेवेचा उपयोग होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत ही सर्व रिक्त पदे भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत टोपे यांनी बुधवारी पुण्यातील तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

प्रश्न – आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे हा नेहमीचा कळीचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित होत आहे. त्याबाबत काय पावले उचलणार?

उत्तर – आरोग्य विभागातील पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. आरोग्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विभागात विशेषत तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असणे ही बाब योग्य नाही. करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आपण कितीही योग्य दिशेने प्रयत्न करत असलो, तरी रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरली जावीत यासाठी प्रयत्नशील आहोत.

प्रश्न – भारतातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, याची कारणे नेमकी काय दिसतात?

उत्तर – महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि सर्वात वेगाने वाढणारे पुणे ही दोन्ही शहरे या राज्यात आहेत. आयटी, ऑटोमोबाईल, पर्यटन या सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या राज्यात देश आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्ण संख्यादेखील मोठी आहे. मात्र, हे सर्व रुग्ण परदेश प्रवासात संसर्ग झालेले आहेत. केवळ नऊ रुग्णांना परदेशातून आलेल्यांच्या संपर्कामुळे हा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून योग्य खबरदारी घेतली जात आहे.

प्रश्न – राज्यातील रुग्णांची प्रकृती कशी आहे, आपण नेमकी काय खबरदारी घेत आहोत?

उत्तर – राज्यातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापैकी कोणाचीही तब्येत खालावली असता अति दक्षता विभाग, व्हेंटिलेटर, सर्व प्रकारची औषधे ही तयारी आपण केली आहे. साथीचा सामाजिक संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) बळावू नये यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. खासगी रुग्णालयांबरोबर आपण अति दक्षता विभाग आणि विलगीकरणासाठी जोडले गेलो आहोत. हॉटेल्स सारखी ठिकाणे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे यंत्रणा म्हणून आपण तयार आहोत.

आई अतिदक्षता विभागात असतानाही..

करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या या लढय़ाचे नेतृत्व करणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे मात्र आईच्या आजारपणात तिची सेवा करण्याची इच्छा बाजूला ठेवून दिवसाचे वीस वीस तास कार्यरत आहेत. आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारी मोठी आहे. करोना विषाणू संसर्ग हे संकट किरकोळ नाही. त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतो, असे टोपे म्हणाले.