तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

पुणे : पुणे शहर आणि परिसरामधील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या आसपास असल्याने तिसऱ्या दिवशीही रात्रीचा गारठा कायम होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडी राहणार असून, त्यानंतर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातही कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. तो पुढील चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडय़ात उष्ण वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका कमी झाला होता. तीन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने राज्यात पुन्हा थंड वारे दाखल होत आहेत. त्यातच कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये तीन दिवसांपासून रात्री चांगलाच गारवा जाणवतो आहे. दिवसाचे कमाल तापमानही घटल्याने उन्हाच्या झळा कमी होऊन दिवसाची काहीसा गारवा जाणवतो आहे. बुधवारी १३.६ अंश सेल्सिअसवर असलेल्या किमान तापमानात गुरुवारी घट होऊन ते ११.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसाचे तापमान अद्यापही ३० अंशांच्या खालीच आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत शहर आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ असून, सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमानात काहीशी वाढ होईल. त्यानंतर ४ फेब्रुवारीपासून पुन्हा निरभ्र आकाशाच्या स्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा काहीशी घट होईल.