कोकणात दाखल झाल्यानंतर वादळामुळे रखडलेल्या मान्सूनने रविवारी पुढे आगेकूच करीत पूर्ण कोकण किनारपट्टीसह, मुंबई, मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापत सांगलीपर्यंत धडक मारली. येत्या चोवीस तासात पुण्यासह राज्याचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या चोवीस तासापासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी पुण्यात १.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
केरळात नेहमीपेक्षा सहा दिवसांनी उशिराने मान्सून दाखल झाला होता. मान्सून कर्नाटकामध्ये आल्यानंतर अरबी समुद्रात ‘नानौक’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने तो कोकणात रत्नागिरीपर्यंत पोहोचला. त्यानंतर मान्सूनचा प्रवास रखडल्याने तो पुढे सरकला नाही. नानौक चक्रीवादळ ओमानकडे गेल्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाला आहे. रविवारी मान्सूनने आपला पुढील प्रवास सुरू केला. त्याने मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, दक्षिण गुजरात, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग,  कोकण किनारपट्टीचा पूर्ण भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला. मान्सूनच्या प्रवासाला पोषक असे वातावरण असल्यामुळे येत्या चोवीस तासात तो पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
कोकणाचा संपूर्ण भाग व्यापल्यानंतर गेल्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतही मान्सूनच्या सरी कोसळल्या. घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस: गुहागर ११०, वेंगुर्ला ६०, भिरा ६०, सावंतवाडी ५०, रत्नागिरी ५०, चिपळूण ४०, राजापूर ४०, संगमेश्वर ३०, कुडाळ ३०, कणकवली ३०, ठाणे २०, शहापूर १०, महाबळेश्वर ४०, सांगली १०, शाहुवाडी १०, ताम्हिणी ७०, लोणावळा ४०, खोपोली ४०, कोयना २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.