पुणे- लोणावळा मार्गावर सर्वाधिक विनातिकीट प्रवासी

मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे ते लोणावळा लोकलसेवेसाठी प्रवासाचा दर सर्वात कमी असतानाही या मार्गावर सर्वाधिक फुकटे प्रवासी सापडत असल्याची गंभीर बाब रेल्वेच्या कारवाईत समोर आली आहे. पुणे ते लोणावळा या चौसष्ट किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ १५ रुपयांची भाडेआकारणी केली जात असली, तरीही विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असल्याने पुढील काळात कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे विभागातील पुणे- मळवली, पुणे- बारामती, पुणे- मिरज त्याचप्रमाणे कोल्हापूर मार्गावर मागील काही दिवसांपासून रेल्वेच्या वतीने तिकीट तपासणीची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये १ एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत तिकीट तपासणीमध्ये २ लाख ३४ हजार प्रकरणात

कारवाई करून १३ कोटी १० लाख ३३ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये १ लाख १३ हजार ४०५ प्रवासी विनातिकीट असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून ६ कोटी ३२ लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या या मोहिमेमध्ये विनातिकीट पकडण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये पुणे- लोणावळा या मार्गावरील प्रवासी सर्वाधिक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. या मार्गावर लोकल गाडीचे प्रवासी भाडे सर्वात कमी आहे. पुणे ते आकुर्डीपर्यंत पाच रुपये, देहूरोडपर्यंत दहा रुपये, तर लोणावळ्यापर्यंत केवळ १५ रुपये भाडे आहे. रस्ते मार्गाने प्रवास केल्यास बससाठी दीडशे ते दोनशे रुपये भाडे मोजावे लागते.

लोकलचे तिकीटदर अत्यंत कमी असूनही याच मार्गावर सर्वाधिक फुकटे प्रवासी सापडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात अशा प्रवाशांविरोधात दंडाबरोबरच इतर कारवाईबाबतही विचार करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वेची संबंधित मोहीम पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, तसेच प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.