पुरोगामी शहर म्हणून ख्याती असलेल्या पुण्यात महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच संपलेल्या वर्षांत पुणे शहरात बलात्काराचे २६४ आणि विनयभंगाचे ७०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्या बरोबरच वर्षभरात पुणे आणि पिंपरीत मिळून १३ हजार ७०१ गुन्हे दाखल झाले असून ते दाखल होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
शहरात बलात्कार, विनयभंग आणि या फसवणुकीच्या गुन्ह्य़ांमध्ये गेल्या वर्षांत वाढ झाली आहे. वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर स्वरुपाचे १३ हजार ७०१ गुन्हे घडले आहेत. शहराचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मंगळवारी गेल्या वर्षीचा गुन्हेविषयक आढावा सादर करताना ही माहिती दिली. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे आदी या वेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त पाठक म्हणाले, की २०१४ मध्ये शहरात गंभीर स्वरूपाचे १२ हजार ७७२ गुन्हे दाखल झाले होते. तर मागील वर्षी (२०१५) दाखल झालेल्या गुन्ह्य़ांची आकडेवारी विचारात घेता गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सात टक्क्य़ांनी वाढले आहे. मात्र, पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून टोळीयुद्धाला लगाम घालण्यात यश मिळवले आहे. मागील वर्षी १७ टोळ्यांतील ११२ सराईतांना मोक्का लावण्यात आला, तर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याचा प्रभावी वापर करुन १२ गुंडांची रवानगी एक वर्षांसाठी कारागृहात करण्यात आली. तसेच, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या १५५ गुंडांना पकडून त्यांच्याकडून १३२ पिस्तुले वर्षभरात जप्त करण्यात आली. गंभीर गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरात व्यापक प्रमाणावर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली
पिंपरी शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे, अशी कबुली सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. वाहन तोडफोड आणि जाळपोळींच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा हात आहे. ही मुले पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात अडचणी येतात. पिंपरीत काही महिन्यांपूर्वी एका नगरसेवकाचा खून झाला होता. या पाश्र्वभूमीवर या परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविला आहे, असेही रामानंद यांनी सांगितले.

ज्येष्ठांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
विमाननगर येथे काही महिन्यांपूर्वी चोरीच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकाचा खून झाला होता. पुणे पोलिसांनी शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिले आहे. त्यांच्या तक्रारीचे निवारण प्राधान्याने करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले.

आयसिसबाबत करडी नजर
विविध शहरांमधील तरुण मुले आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी जाण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. पुणे पोलिस अशा घटना रोखण्यासाठी राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या सातत्याने संपर्कात असतात. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, असे पोलीस आयुक्त पाठक यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील गुन्हे- २०१५
गुन्हे        दाखल        उघड
खून         १२५          १२३
खुनाचा प्रयत्न    १८०         १७६
नवविवाहितेचा मृत्यू ३९     ३९
साखळी चोरी     ३५२        १९१
रात्रीच्या घरफोडय़ा ८५५      २५८
दिवसाच्या घरफोडय़ा ३३९  ८५
बलात्कार          २६४   २६४
विनयभंग   ७०५       ६८४