राजस्थानातील कामगार आठ गाडय़ांमधून रवाना

पुणे : टाळेबंदीत गेल्या दीड महिन्यांपासून शहरात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार आठ प्रवासी गाडय़ांमधून मूळ गावी रवाना झाले. कामगारांना मूळगावी पाठविण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.

टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यापासून बिबवेवाडी, इंदिरानगर भागात राजस्थानातील कामगार अडकून पडले होते. त्यांना  मूळ गावी परतायचे होते. मात्र, वाहन व्यवस्था तसेच राज्यातून बाहेर पडू शकत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. टाळेबंदीत काही नियम शिथिल झाल्यानंतर बिबवेवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते मेघराज राठी यांनी राजस्थानातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मूळ गावी पाठविण्यासाठी अर्ज सादर केले होते. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी अर्जाची पडताळणी केली. परिमंडळ

पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे अर्ज सादर केले.

त्यानंतर कामगारांना मूळगावी पाठविण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २५४ कामगार, कुटुंबीय आणि लहान मुलांना राजस्थानात पाठविण्यासाठी आठ प्रवासी गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली. गुरुवारी (७ मे) सायंकाळी कामगार, कुटुंबीयांना रवाना करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी गाडय़ांना हिरवा झेंडा दाखवून कामगारांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस उपायुक्त बावचे, पुणे महानगर विकास प्राधिकरणातील पोलीस अधीक्षक सारंग आवाड, पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले आदी यावेळी उपस्थित होते.