पुणे शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा कहर अद्यापही सुरुच आहे. आज दिवसभरात पुणे शहरात १७६ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे या दोन्ही महानगरांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सध्या या दोन्ही शहरांमध्ये लॉकडाउनमधून बरीच सूट देण्यात आल्याने लोकांनी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजांना सुरुवात केली आहे.

पुण्यात आज दिवसभरात १७६ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ७ हजार २६५ वर पोहोचली. तर दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ३६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १५७ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ५०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधितांची संख्या सहाशे पार

दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात तब्बल ५८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून यात ८ जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांनी सहाशेचा आकडा ओलांडला असून बाधितांची एकूण संख्या ६३४ वर पोहचली आहे. तर आज दापोडी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आज सर्वाधिक ४७ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३६६ शहरातील तर शहराबाहेरील ४७ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मृतांचा आकडा हा २६ वर पोहचला आहे.