हजारो वारकरी दोन दिवस मुक्कामी; वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन बुधवारी (२६ जून) शहरात होणार आहे. प्रथेप्रमाणे नाना-भवानी पेठेत पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असेल. पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन तसेच पोलिसांनी तयारी सुरू केली असून पुढील तीन दिवस शहरात कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत.

पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी दाखल होईल. प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेशखिंड रस्ता, फग्र्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल.

श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. पालख्या गुरुवारी (२७ जून) मुक्कामी थांबून  शुक्रवारी (२८ जून) पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

भाविकांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था

पालखी सोहळा पाहण्यासाठी मुंबई तसेच अन्य शहरातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. भाविकांसाठी  रेंजहिल्स येथील मैदान, एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओजवळ), अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैदान (शिवाजीनगर), रेसकोर्स येथे वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. वाहनचालकांनी शक्यतो मध्यभागातील रस्त्यांचा वापर टाळावा. वर्तुळाकार मार्ग वापरावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

मध्यभागातील बंद राहणारे रस्ते

शहराच्या मध्यभागातील टिळक चौक ते वीर चापेकर चौक (फग्र्युसन रस्ता), शनिवार वाडा ते संचेती चौक, कुंभार वेस चौक ते गाडगीळ चौक, मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक, शास्त्री रस्ता ते सेनादत्त पोलीस चौकी, टिळक रस्ता (पूरम चौक ते टिळक चौक), लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (जिजामाता चौक ते बुधवार चौक ते बेलबाग चौक), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते बेलबाग चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक हे रस्ते बुधवारी (२६ जून) वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.