शिवदुर्ग रेस्क्यू पथक, पाटण ग्रामस्थांची मदत

लोणावळा : विसापूर किल्ल्याच्या कडय़ालगत असलेल्या दरीत अडकलेल्या एका युवकाची शिवदुर्ग मित्र गिर्यारोहण संस्था तसेच पाटण ग्रामस्थांनी सुटका केली.

यश कासट (वय २०, रा.पुणे) असे सुटका करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पाटण गावातून कासट अणि त्याच्याबरोबर असलेले मित्र विसापूर किल्ल्यावर फिरायला गेले होते. कडय़ावरून खाली उतरण्याच्या नादात कासट दरीत उतरला. तेथून त्याला खाली तसेच वर जाण्यास अडचण जाणवली. दरम्यान, तो कडय़ालगत असलेल्या दरीतील एका कपारीत अडकल्याची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पाटण ग्रामस्थांना ही माहिती दिली. पाटण गावातील ग्रामस्थ तेथे गेले. त्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी कडय़ावरून दोर दरीत सोडला. त्याने तो त्याच्या कमरेभोवती बांधला. मात्र, कपारीत अडीच ते तीन तास अडकल्यामुळे कासटला वर चढून जाता येत नव्हते. त्याचे पाय थरथरत होते.

ग्रामस्थांनी शिवदुर्ग मित्र गिर्यारोहण संस्थेतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या संस्थेच्या पथकातील सदस्य योगेश उंबरे, रोहित वर्तक, वैष्णवी भांगरे, अनिल सुतार, आनंद गावडे, सुनील गायकवाड, ग्रामस्थ सागर कुंभार, सिद्धेश तिकोणे, मयूर तिकोणे, ओंकार कोंडभर यांनी कासटची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर योगेश उंबरे, रोहित वर्तक गिर्यारोहणाचे साहित्य घेऊन दरीत उतरले. दोघांनी कपारीत अडकलेल्या कासटची सुटका केली. तेव्हा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कासटने सुटका करणाऱ्या गिर्यारोहक तसेच ग्रामस्थांचे आभार मानले.