चिंचवड येथील प्रयोग थिएटर आणि परफॉर्मिग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय संगीतकार आनंद मोडक स्मृती ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ या बाल कला महोत्सवातही सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्याने कळस गाठला. लहानग्यांसह मोठय़ांनीही या गाण्यावर नाचून आपली हौस भागवून घेतल्याचे चित्र दिसून आले.

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात झालेल्या या महोत्सवात ६ ते १६ वयोगटांतील कलाकार, प्रशिक्षक, सहायक आणि रसिकांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी संगीत स्वरनादचे, ‘माझे गाणे आईबाबांसाठी’ हा धमाल मराठी-हिंदूी गाण्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर विविध लोकप्रिय गाण्यांवर सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी गायक, कलाकारांनी सैराटच्या गाण्यावर सादरीकरण केले, त्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. लहान मुलांपासून सहभागी कलाकार तसेच रसिकांनीही या गाण्याच्या तालावर बेधुंद नाच केला. दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक बाल नाटय़ महोत्सवाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संयोजन योगेश दळवी, रेवती दळवी यांनी केले. चारही नाटकांचे नेपथ्य शीलरत्न जमदाडे यांनी केले. प्रकाशयोजना रघू ढमढेरे, संजय कांबळे यांनी केली होती.