पुणे : शहरात १०२ अतिधोकादायक वाडे आणि इमारती असून, त्यांतील १३ वाड्यांचा भाग महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या कारणास्तव उतरविला आहे. येत्या सात जूनपर्यंत शहरातील ५० ते ६० अतिधोकादायक वाड्यांचा भाग काढून टाकण्याचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे.

शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील धोकादायक वाडे, इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस दिली जाते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात १०२ धोकादायक वाडे आढळले आहेत. त्यांना बांधकाम विभागाने नोटीस बजाविली. शहराच्या मध्य वस्तीत हे जुने वाडे आणि इमारती आहेत. त्यांच्या मालक व भाडेकरूंमध्ये वादविवाद असल्याने अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कोणीही राहत नाही. न्यायालयात वाद सुरू असल्याने त्यांची देखभाल-दुरुस्तीही केली जात नाही. त्यामुळे हे जुने वाडे-इमारती अधिक धोकादायक बनले आहेत.

पावसाळ्यात हे वाडे पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे महापालिकेकडून दर वर्षी अशा मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार या मिळकतींचे अतिधोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक असे वर्गीकरण केले जाते. अतिधोकादायक इमारती तसेच वाडे सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या वतीने उतरविले जातात. याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. दर वर्षी मे आणि जून महिन्यात ही कारवाई केली जाते, अशी माहिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात १०२ अतिधोकादायक इमारती आणि जुने वाडे आढळले आहेत. त्यांपैकी ७७ ठिकाणी सध्या नागरिक राहत आहेत. या वाड्यांना महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या (कलम १६० (ब) व (क)) अंतर्गत नोटीस बजावून हे वाडे त्वरित रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील अतिधोकादायक असलेल्या १३ वाड्यांचा धोकादायक भाग काढून घेतला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उर्वरित अतिधोकादायक झालेल्या वाड्यांचा भागदेखील काढला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील अतिधोकादायक वाडे, इमारतींना बांधकाम विभागाने नोटीस बजावून तेथे राहू नये, असे सांगितले आहे. अतिधोकादायक वाड्यांचा भाग कोसळून दुर्घटना घडू शकते, अशा १३ वाड्यांचा भाग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काढून टाकण्यात आला आहे. ही कार्यवाही पुढे सुरूच राहणार आहे. – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका