विकास आराखडा मंजुरीनंतर जादा एफएसआय मिळणार

पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सोसायटय़ांना मालकी हक्क देण्याचा आणि पुण्याचा विकास आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर पूरग्रस्त वसाहतीतील बांधकामे जादा चटईक्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) देऊन नियमित करण्याचा निर्णय महसूल, पुनर्वसन व मदत कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ‘कोकण भवन’ येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला.

पानशेत पूरग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मागणीनुसार झालेल्या या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुनर्वसन सचिव मालिनी शंकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार मिसाळ, कुलकर्णी, पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांची बैठकीत प्रमुख उपस्थिती होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पानशेत पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ही बठक झाली. पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्त सोसायटय़ांना मालकी हक्क देण्याचा निर्णय पाटील यांनी बैठकीत जाहीर केला. या जागा मालकी हक्काने मिळाव्यात, असे प्रस्ताव या सोसायटय़ांनी राज्य शासनाकडे सादर केलेले होते. त्यावर शासन निर्णय शुद्धिपत्रक ३१ मार्च २०१५ नुसार १९९१च्या प्राइम लँडिंग रेटनुसार रक्कम भरून मालकी हक्क देण्यासही पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली. बठकीत १५ जुलै २०१४ रोजी तत्कालीन महसूलमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बठकीतील निर्णयांवर कार्यवाही करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत चर्चा होऊन पूरग्रस्तांना दिलेल्या गाळय़ाच्या सभोवताली केलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत तसेच अनधिकृत हस्तांतरणे नियमान्वित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्याबाबत लवकरात लवकर आदेश काढण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच ज्या पूरग्रस्तांनी यादीत नाव नसताना मालकी हक्काची रक्कम भरण्याचे विनंतिअर्ज केले आहेत, त्यांच्याकडूनही पसे भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  या निर्णयाचा फायदा निसेन हट्स (सोसायटय़ा ६), पद्मावती परिसर व मागासवर्गीय सोसायटय़ा (२०), सहकारनगर क्रमांक १ व २ (सोसायटय़ा ५७), चतु:शृंगी वसाहत (सोसायटय़ा २०) अशा १०३ सोसायटय़ांना होणार आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षातर्फे स्वागत करण्यात आले असून, पानशेत पूरग्रस्तांचे विविध प्रश्न गेली छप्पन्न वष्रे प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांनी उचललेले पाऊल सकारात्मक असून, सरकार संवेदनशील असल्याची जनतेतील भावना दृढ करणारे आहे. त्याबद्दल राज्य शासनाचे व आपले अभिनंदन, असे पत्र पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पाटील यांना दिले आहे.