पुणे : पुण्यात मे महिन्यात घरांच्या खरेदी-विक्रीचे ११ हजार ९३० व्यवहार झाले आहेत. घरांच्या एकूण विक्रीत ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. त्यामुळे पुणेकरांची परवडणाऱ्या घरांना पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, पुण्यात मे महिन्यात घरांच्या खरेदी-विक्रीचे ११ हजार ९३० व्यवहार झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात १२ हजार २८० घरांची विक्री झाली होती. यंदा एप्रिल महिन्यात १४ हजार ४२१ घरांची विक्री झाली. त्या तुलनेत यंदा मेमध्ये घरांच्या विक्रीत १७ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षातील ऑक्टोबरनंतरची ही घरांच्या व्यवहारांची नीचांकी पातळी आहे. याचबरोबर एप्रिलमध्ये ५४७ कोटी रुपये असलेले मुद्रांक शुल्क संकलन मेमध्ये ४२१ कोटींवर आले आहे. त्यात २३ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे.
पुण्यात मे महिन्यात झालेल्या घरांच्या एकूण व्यवहारात २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २० टक्के आहे. याचवेळी २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २९ टक्के आहे. त्यामुळे पुण्यातील घरांच्या एकूण व्यवहारांमध्ये परवडणाऱ्या घरांचे प्रमाण ४९ टक्के म्हणजेच जवळपास निम्मे आहे. याचबरोबर ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३३ टक्के, १ ते २.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १७ टक्के, २.५ ते ५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २ टक्के आणि ५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण १ टक्क्यांहून कमी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी ते मे दरम्यान वाढ
या वर्षातील जानेवारी ते मे कालावधीचा विचार करता घरांचे व्यवहार आणि मुद्रांक शुल्क संकलनात वाढ झाली आहे. पुण्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत घरांचे ८५ हजार २९० व्यवहार झाले आणि त्यातून ३ हजार ७९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. यंदा जानेवारी ते मे कालावधीत ९९ हजार ३३९ घरांचे व्यवहार झाले असून, त्यातून ३ हजार ६८७ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. यंदा पहिल्या पाच महिन्यांत घरांचे व्यवहार आणि मुद्रांक शुल्क संकलनात अनुक्रमे १६ व २० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांच्या एकूण व्यवहारात मे महिन्यात घट नोंदविण्यात आली आहे. प्रामुख्याने १ ते ५ कोटी रुपयांच्या घरांना मागणी कमी झाली आहे. या वर्षातील पहिल्या पाच महिन्यांचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरांची विक्री जास्त आहे.- शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया