पुणे : राज्यात अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र हे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांनी चक्क गुणपत्रिका, जात प्रमाणपत्राच्या जागी इमोजी टाकले आहेत किंवा कोणती-कोणती छायाचित्रे जोडली आहेत. या करामतींमुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांना दोन प्रकारची माहिती नोंदवावी लागते. भाग एकमध्ये नाव, दहावीचा बैठक क्रमांक, गुण, गुणपत्रिका, जात आदी वैयक्तिक तपशील असतो. तर, भाग दोनमध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम आदी तपशील नोंदवावा लागतो. मात्र, काही विद्यार्थ्यांनी माहिती, प्रमाणपत्रे आदी जोडण्याऐवजी इमोजींचा वापर किंवा एखादे छायाचित्र अपलोड करणे असे प्रकार केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

एका अर्थी हा तंत्रज्ञानाचा गैरवापर असून त्यामुळे प्रवेशप्रक्रिया राबवताना कराव्या लागणाऱ्या विदा विश्लेषणात अडचणी निर्माण होतात. पहिल्या फेरीमध्ये १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्जात वेगवेगळ्या चुका केल्याचे निदर्शनास आले होते. ऑनलाइन प्रणाली वापरकर्त्यांनी योग्य पद्धतीने न वापरल्यास त्याचा फटका इतरांनाही बसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया ही विद्यार्थ्यांना सुलभरीत्या प्रवेश मिळण्यासाठी राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच करणे अपेक्षित आहे. – डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय