या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानोबा माउली तुकाराम.. विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.. अशा गजरात टाळ आणि मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरत वारकरी कीर्तनरंगी रंगले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाईंच्या अभंगांचे सार सलग बारा तासांच्या कीर्तनातून ऐकताना वारकरी दंग झाले. तहान-भूक विसरुन विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांनी पुण्यात विसाव्याला असताना नारदीय कीर्तनाचा भक्तिमय आनंद लुटला.

निमित्त होते, शाहीर िहगे लोककला प्रबोधिनी आणि श्रेयस को-ऑप. क्रेडिट सोसायटी नवी सांगवीतर्फे महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ आणि कीर्तन सार्वभौम गजाननबुवा राईलकर यांना समíपत भक्ती-शक्ती एकात्म नाम सोहळा अखंड कीर्तनमालेचे. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, सोसायटीचे अध्यक्ष सतिश मदने, होनराज मावळे, विजय गायकवाड, सुरेश तरलगट्टी, अरुणकुमार बाभुळगावकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनमालेचे हे तिसरे वर्ष होते.

कीर्तनकार प्रसाद सबनीस यांच्या हरिपाल या विषयावरील कीर्तनाने सोहळ्याला सुरुवात झाली. सबनीस म्हणाले,‘‘भक्ताच्या मनात भाव असेल, तरच भक्ती निष्ठांवत होते. मनात भाव नसेल, तर भक्ती उत्पन्न होणार नाही. त्यामुळे निष्ठावंत भाव कसा असावा, हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून सांगितले आहे.’’ त्यानंतर कीर्तनकार मंगलमूर्ती औरंगाबादकर, प्रेमा कुलकर्णी यांचे कीर्तन झाले.

दुपारी युवा कीर्तनकार रुद्राणी नाईक यांच्या कीर्तनाने सोहळ्यात रंग भरला. कीर्तनकार किरण कुलकर्णी, श्रेयस कुलकर्णी, संगीता मावळे, रामचंद्रबुवा भिडे यांनी  केलेल्या कीर्तनातही वारकरी मंत्रमुग्ध होऊन गेले.

हेमंतराजे मावळे म्हणाले,की गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला पायी चालत जाण्याची परंपरा वारकरी भक्तांनी अखंड चालू ठेवली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू आळंदी येथून प्रस्थान ठेवतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी भक्तांसाठी सलग बारा अखंड नारदीय कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले. मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्सनेही या उपक्रमात सहभाग घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 hrs kirtan for wari
First published on: 01-07-2016 at 05:40 IST