कसबा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) झाली. त्यानुसार या मतदारसंघात १४०१ जणांनी ‘नोटा’ पर्याय वापरला, तर २२ मते बाद झाली आहेत. तसेच ११ अपक्षांना मिळून एकूण १०३२ मते मिळाली आहेत. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर विजय मिळविला. या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा >>> “भाजपाने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली”, पराभवानंतर मविआचे उमेदवार नाना काटेंचं विधान
या निवडणुकीसाठी ५१.६ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी धंगेकर यांना ७३ हजार ३०९, तर रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली. काँग्रेस, भाजप व्यतिरिक्त सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डाफळ यांना १५३, प्रभुद्ध रिपब्लिक पार्टीचे बलजितसिंग कोच्चर यांना ५१, राष्ट्रीय मराठा पक्षाचे रवींद्र वेदपाठक यांना ४१ मते मिळाली. याशिवाय ११ अपक्षांना मिळून १०३२ मते मिळाली. २२ मते बाद ठरली, तर २७ बनावट मतदान झाले, अशी माहिती कसबा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
बिचकुलेला ४७ मते ‘बिग बॉस’फेम अभिजीत बिचुकले याने या मतदार संघात अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्याला ४७ मते मिळाली.