कात्रज येथे एका गॅस सिलेंडरमधील गॅस दुसऱ्या व्यावयायिक सिलेंडरमध्ये भरत असताना स्फोट होऊन मोठी दुर्घटना ताजी असताना, अशाच प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत असताना मुंढवा पोलिसांनी कारवाई करुन दोघांना पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओमप्रकाश साजनराम बिष्णोई (वय ४९) आणि विकास रिचपाल भादू (वय २०, दोघे रा. काळे पडळ, सासणेनगर, हडपसर मुळ राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६१ घरगुती गॅस सिलेंडरच्या भरलेल्या टाक्या, ४ व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या, रिकाम्या टाक्या, दोन टेम्पो, ५२ ग्राहकांच्या पावत्या, इतर साहित्य असा ३ लाख ५१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सांगितले की, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंढवा येथील एबीसी रोडवरील सॅटेलाईट लेनमध्ये पोलीस पथकाने जाऊन पाहणी केली असताना दोन टेम्पोमध्ये एका गॅस सिलेंडरमधील गॅस दुसऱ्या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी छापा टाकून दोघांना पकडले. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यावर ओमप्रकाश बिष्णोई याने सांगितले की, त्याचा मित्र बलराम बिष्णोई याने राजस्थानमध्ये असताना एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये रिफिल सॉकेटद्वारे गॅस कसा भरायचा हे शिकवले.

या दोघांकडे एच पी कंपनीच्या एकूण ५२ ग्राहक पावत्या आढळून आल्या. इतक्या ग्राहकांच्या पावत्या एकाचवेळी त्यांच्याकडे कशा आल्या. याचा अर्थ ते गॅस एजन्सीमार्फत ग्राहकांच्या नावाने गॅस सिलेंडर घेऊन त्यातील गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरुन तो व्यावसायिक किंमतीला विकून फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 arrested from pune in connection with gas filling scam pune print news scsg
First published on: 28-04-2022 at 14:32 IST