पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील २२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये चार सहायक आयुक्त, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यासह विविध पदांचा समावेश आहे.

महापालिकेतील नगरसेवकांचा १३ मार्च २०२२ रोजी कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मागील साडेतीन वर्षांपासून आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. महापालिका पदोन्नती समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

शैक्षणिक अर्हता, अनुभव, कालावधी, सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य माहिती अधिकारी एक, सहायक आयुक्त चार, कार्यकारी अभियंता स्थापत्य एक, प्रशासन अधिकारी सहा, उप अभियंता स्थापत्य ३०, सहायक मेट्रन तीन, कार्यालय अधिक्षक आठ, मुख्य लिपिक ७२, उपलेखापाल २५, लिपिक ६२, वीजतंत्री तीन, कनिष्ठ अभियंता चार, आराेग्य निरीक्षक एक, परिचारिका प्रमुख तीन आणि चार नाईक अशा २२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यात आली.

दरम्यान, नगरसेवक असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नतीसाठी विधी समिती, सर्व साधारण सभेच्या मंजुरीनंतरच पदाेन्नती मिळते. यामध्ये बराच कालावधी जाताे. मात्र, प्रशासकीय राजवटीत जलद गतीने अधिकाऱ्यांना पदाेन्नती मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील साडेतीन वर्षांत सुमारे पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्यात आली आहे.