राज्यातील सात शहरांमधील पायाभूत आराखडय़ाचा टप्पा-दोन अंतर्गत वीज यंत्रणा उभारण्याच्या विविध कामांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यात पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील वीज यंत्रणेच्या उभारणीसाठी ९६३ कोटी रुपयांच्या मंजुरीचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मिळून पुढील तीन वर्षांमध्ये २७ नवी वीज उपकेंद्रे, १०१५ किलोमीटर भूमिगत वाहिन्या, ८४१ नवी रोहित्रं, २५९२ फिडर पिलर्स आदी कामे करण्यात येणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने सात शहरांसाठी दुसरा टप्प्या अंतर्गत वीज यंत्रणा उभारणीच्या कामांना दिलेल्या मंजुरीनुसार एकूण १८०४ कोटी ३२ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. पुणे व िपपरी- चिंचवडमध्ये पायाभूत आराखडय़ातील विविध कामांमुळे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींसह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा यंत्रणेसह नवीन वीजजोडण्या उपलब्ध होऊ शकतील, असे महावितरणचे म्हणणे आहे.
पुणे व िपपरी- चिंचवड शहरांमध्ये पायाभूत आराखडय़ानुसार २७ वीज उपकेंद्रांची उभारणी होणार आहे. दोन उपकेंद्रांच्या क्षमतेमध्ये वाढ, तर एका उपकेंद्रामध्ये अतिरिक्त उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. उच्चदाबाच्या ७३० किलोमीटर आणि लघदाबाच्या २८५ किलोमीटर अशा एकूण १०१५ किलोमीटर नवीन भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येतील. नवीन रोहित्र बसविण्याबरोबरच ४८५ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या शिवाय पुणे व िपपरी- चिंचवड शहरातील सुधारणा व आधुनिकीकरण योजनेअंतर्गत उच्चदाबाच्या ३८३ किलोमीटर व लघुदाबाच्या ६७० किलोमीटर अशा १०५३ किलोमीटर नवीन भूमिगत वाहिन्याही टाकण्यात येणार आहेत.