पुणे : बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, त्यात उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी गेल्या वर्षी एप्रिलपासून यंदा १६ मेपर्यंत ३० वर्षांवरील १ कोटी ६७ लाख जणांची रक्तदाब तपासणी केली. त्यात २८ लाखांहून अधिक जणांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात येते. या अंतर्गत २०२४-२५ या मध्ये १ कोटी ३६ लाख ४५ हजार ९९४ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली, त्यापैकी २३ लाख ८७ हजार ३०८ रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत पाठपुरावा करून उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाकडून या वर्षी १६ मेपर्यंत ३१ लाख २३ हजार ९२१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख १० हजार ३६२ जणांचे उच्च रक्तदाबाचे निदान झाले. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उच्च रक्तदाब चाचणी आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत.
उच्च रक्तदाबाची लक्षणे
– डोकेदुखी
– छातीत दुखणे
– चक्कर येणे
– दृष्टीभ्रम
– नाकातून रक्त येणे
– थकवा
– हृदयाची धडधड
– श्वासोच्छ्वासाला त्रास
– धाप लागणे
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे उपाय
– आहारामध्ये तेल, तूप व मिठाचा कमी प्रमाणात वापर करावा
.- संतुलित आहार, फळे, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे.
– तंबाखू आणि मद्यसेवन टाळावे.
– नियमित व्यायाम अथवा योगासने करावीत.
– वजन नियंत्रित ठेवावे.
– तणावांपासून मुक्त राहावे.
– रक्तदाबाची नियमित चाचणी करावी.
अनियंत्रित रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, डोळ्यांमधील समस्या अशा अनेक गुंतागुंती होऊ शकतात. लवकर निदान, जीवनशैलीत बदल अणि उपचारातील सातत्य याद्वारे ही गुंतागुंत टळू शकते. – डॉ. डी. एन. हंबीरे, संचालक, विश्वराज हॉस्पिटल
उच्च रक्तदाबामुळे रेटिनल व्हॅस्क्युलर ऑक्लुजनची (आरव्हीओ) जोखीम वाढू शकते. या स्थितीमध्ये नसांमधून नेत्रपटलाकडे जाणारा रक्तप्रवाह खंडित होतो. यावर उपचार न केल्यास दृष्टी धूसर होऊ शकते किंवा दृष्टी जाण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करावी. – डॉ.सुचेता कुलकर्णी, वैद्यकीय संचालिका, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
उच्च रक्तदाब ही अनेकदा प्रौढांमधील एक आरोग्य समस्या मानली जाते. मात्र, बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली किशोरवयीन मुलांमध्येही या आजाराचे निदान मोठ्या प्रमाणात होत आहे. उच्च रक्तदाबाचा मुलांच्या हृदय आणि महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर, तसेच एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होतो. – डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, बालरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल