पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन आतापर्यंत १९ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. ही मदत मिळण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून तब्बल २९ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.करोना मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आर्थिक साहाय्य देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाकडे असलेली करोना मृतांची आकडेवारी आणि प्रत्यक्षात आलेले आर्थिक मदतीसाठी प्राप्त अर्ज यांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. करोनामुळे व्यक्तींचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्यास संबंधित रुग्णालयांकडून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) नोंद केली जाते. काही रुग्णालयांकडून आयसीएमआरवर नोंद न करणे किंवा रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही तफावत आली असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आले.

आतापर्यंत २९ हजार ७२६ अर्ज आर्थिक मदतीसाठी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडे नोंद झालेल्या १९ हजार ६८२ मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ९६०७ अर्ज नामंजूर करण्यात आले असून संबंधितांना कागदपत्रांच्या छाननीसाठी नियुक्त समितीसमोर कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अर्जाची ऑनलाइनच पडताळणी करून अर्ज मंजूर करण्यात येत आहेत.  ज्या अर्जामध्ये त्रुटी किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशा अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

मृतांपेक्षा जास्त अर्ज येण्याची कारणे

करोनामुळे मृत झालेल्या एकाच व्यक्तीच्या नावे दोनदा अर्ज करण्यात आले आहेत. कुटुंबातील आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मुलगा आणि विवाह झालेल्या मुलीने अर्ज केला आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्यात इतर राज्य आणि जिल्ह्यांमधील व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयांत दाखल झाल्या होत्या. अशा संबंधित व्यक्तींच्या नातेवाइकांनी देखील जिल्हा प्रशासनाकडे अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात प्रत्यक्षात १९ हजार ६८२ मृत्यू झाले असले, तरी प्रत्यक्षात २९ हजार ७२६ अर्ज आले आहेत, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.