महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत ३८० हरकती आणि सूचना महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये आणि सावरकर भवन येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे या हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत सूचना देता येणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात २२ ऑगस्टला प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत महापालिका प्रशासनाकडे ३८० हरकती आल्या आहेत. यामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीसाठी झालेल्या प्रभागरचनेवर सुमारे अडीच हजारांहून अधिक हरकती आणि सूचना आल्या होत्या. आगामी निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेवर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या ३८० हरकतींपैकी खराडी येथील थिटे वस्तीतील १३० नागरिकांनी एकसारखीच हरकत दाखल केली आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात समावेश असलेल्या प्रभागांबाबत त्यापाठोपाठ हरकती दाखल झालेल्या आहेत.

शहरात ४१ प्रभाग महापालिका प्रशासनाने तयार केले आहेत. ४० प्रभाग हे चार सदस्यांचे, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे प्रभागरचना करताना उपनगरांमध्ये मोठ्या आकाराची प्रभागरचना प्रशासनाने केली आहे. शहरातील मध्यवर्ती पेठांचा समावेश असलेल्या प्रभागांच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनांमध्ये प्रभागांना देण्यात आलेल्या नावांवर काही हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

हरकतींचे स्वरूप

प्रभागाच्या नावात बदल करण्यात यावा. प्रभागांच्या सीमारेषेत बदल करण्यात आला आहे. नाले, ओढे, नदी ओलांडून प्रभागरचना करण्यात आली आहे. या स्वरूपाच्या हरकती नोंदविण्यात आल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडे ३८० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांकडून अद्याप हरकती नोंदविण्यात आलेल्या नाहीत. – प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका –