संत नामदेव यांच्या अभंगांच्या चारशे वर्षांपूर्वीचे दुर्मिळ हस्तलिखित भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये जतन करण्यात आले आहे. संत नामदेव यांनी ज्ञानदेवांसह केलेल्या वैष्णवमेळय़ाचे वर्णन ‘तीर्थावळी’ या अभंगात्मक ग्रंथामध्ये समाविष्ट आहे.
संत नामदेव यांनी शके १२०४ मध्ये ज्ञानदेवांसह तीर्थयात्रा केली. हा वैष्णवांचा मेळा शके १२१६ मध्ये श्रीक्षेत्र काशी येथे पोहोचला. त्यानंतर शके १२२० आणि शके १२६१ अशी दोन वेळा नामदेव यांनी तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेचे वर्णन ‘तीर्थावळी’ या अभंगात्मक ग्रंथामध्ये पाहावयास मिळते. त्याची प्राचीन प्रत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये जतन करण्यात आली आहे. केवळ संस्कृत हस्तलिखितेच नव्हे, तर संत नामदेवांचे अभंगात्मक ‘तीर्थावळी’ हे हस्तलिखित शके १५०३मधील (इ. स. १५८१) म्हणजे ४३२ वर्षांपूर्वीचे आहे. हे हस्तलिखित शके १५०३, राक्षस संवत्सरे, भाद्रपद शुद्ध सप्तमीस पंढरपुरी लेखन समाप्त केल्याचा उल्लेख आहे, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि हस्तलिखित जतनाचा उपक्रम राबविणारे वा. ल. मंजूळ यांनी दिली.
विशेष म्हणजे हा संतमेळा प्रथम नीरा-भीमा संगमावर टेंभुर्णीजवळील नीरा नरसिंहपूर येथे प्रथम स्नान करून निघाला. पंढरी माहात्म्यामध्ये हे क्षेत्र पंढरी माहात्म्याचे एक द्वार मानले गेले आहे. तेथून हा वैष्णव मेळा गोदावरी स्नानास गेल्याचे या अभंगामध्ये नमूद आहे. ‘पंचवटी जनकस्थान’ पाहिले असल्याचा उल्लेख या अभंगाच्या पहिल्याच पानावर असल्याचेही वा. ल. मंजूळ यांनी सांगितले.