पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुंडांनी दहशत माजविली आहे. उपनगरातील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांची दहशत आहे. शहरातील पोलीस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे.

हेही वाचा >>> प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 

शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगने दहशत माजविली होती. सुरुवातीला हडपसर भागात कोयता गँगने दहशत माजविली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या गु्न्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तडीपारीनंतर शहरात वास्तव्य

तडीपार कारवाई केल्यानंतर देखील अनेक सराईत शहरात वास्तव्यास आल्याचे यापूर्वी वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. तडीपार केल्यानंतर गुंड शहरात आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.