राज्यात १० वर्षांखालील ५५५ मुलांना लागण

अनेक मुले या आजारातून सुखरूप बरी झाली आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
राज्यात विविध ठिकाणी करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून येत असताना लहान मुले देखील त्याला अपवाद नाहीत. मात्र दिलासादायक गोष्ट अशी, की लहान मुले या आजारावर यशस्वीपणे मात करताना दिसत आहेत. नवजात बालकांपासून ते १० वर्षे वयापर्यंतच्या तब्बल ५५५ मुलांना आजपर्यंत करोना विषाणू संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील अनेक मुले या आजारातून सुखरूप बरी झाली आहेत.

ससून रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर म्हणाल्या, चार महिने ते दहा वर्ष वयातील मुलांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. चार महिन्यांचे बाळ बरे होऊन सुखरूप घरी गेले आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या एमआर, बीसीजी यांसारख्या लसींमुळे त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे सौम्य राहतात अशी शक्यता दिसत आहे, मात्र त्याबाबत संशोधन नसल्यामुळे तसा थेट निष्कर्ष काढणेही चुकीचे ठरेल.

मुलांमध्ये होणारा संसर्ग हा प्रामुख्याने त्यांच्या घरातील व्यक्तीला लागण झाल्यामुळे दिसत आहे. काही विषाणूजन्य आजारांमध्ये रक्तपेशी कमी होण्याचा प्रकार दिसतो, तसा तो काही मुलांमध्ये दिसला. मात्र, त्याचे स्वरूप मोठय़ा माणसांमध्ये दिसते तेवढे गंभीर दिसत नाही, ही समाधानाची बाब आहे.

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपाली अंबिके म्हणाल्या, आमच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच मुलांना संपूर्ण बरे वाटल्यानंतर नुकतेच घरी सोडण्यात आले. मोठय़ा माणसांच्या प्रकृतीत दिसणारी गुंतागुंत करोनाबाधित लहान मुलांमध्ये अद्याप दिसलेली नाही, ही विशेष गोष्ट आहे. आई-बाबा किंवा आजी-आजोबा करोना बाधित असल्यामुळे संसर्गाची लागण झालेली मुले सर्वाधिक आहेत. बहुसंख्य मुलांमध्ये लक्षणे देखील नाहीत.

आमच्याकडे उपचार घेणाऱ्या दोन लहान मुलांमध्ये रक्तपेशी झपाटय़ाने कमी झाल्याचे दिसून आले, मात्र त्या परिस्थितीत सुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत होती. पाच मुले संपूर्ण बरी होऊन घरी परतली आहेत, अद्याप दाखल असलेल्या मुलांची प्रकृतीही चांगली आहे.

मृत्यूचे प्रमाण शून्य  : राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सविस्तर अहवालातून ही बाब समोर आली आहे. बुधवार (७ मे) पर्यंत राज्यातील ५५५ बालकांना करोनाची लागण झाली आहे. असे असले, तरी सकारात्मक गोष्ट म्हणजे या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. त्यामुळे करोना विषाणू संसर्गाचे भय सर्वत्र असताना मुलांबाबत ही चांगली बाब राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 555 children under 10 years of age infected in the state abn