परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षण न घेता इतर ‘उद्योग’ करीत बसतात. विद्यार्थी व्हिसावर आल्यानंतर नियमाप्रमाणे कोणताही व्यवसाय अथवा नोकरी करण्यास परवानगी नसते. त्यामुळे आता परदेशी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ६५ टक्के हजेरी आवश्यक केली आहे. जून महिन्यापासून प्रत्येक महिन्याला त्याची माहिती परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयास पाठविणे बंधनकारक केले आहे. ६५ टक्के हजेरी न भरल्यास त्या विद्यार्थ्यांना परत त्यांच्या देशात पाठविले जात आहे, अशी माहिती परदेशी नोंदणी विभागाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याच्या अगोदर हजेरी कमी का भरली याची कारणे विचारली जातात. ती योग्य वाटल्यास त्याला सवलत दिली जाते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील यांना या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. पाटील म्हणाले की, भारतात इराण देशातून सर्वाधिक परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यानंतर अफगाणिस्तानमधून विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी प्रामुख्याने इंग्रजी बोलण्यासाठीचे अभ्यासक्रम, संगणकाचे कोर्सेस करण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्या देशात आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेण्याऐवजी इतरच उद्योग करीत बसतात. ज्या कोर्सेससाठी आले त्यांना हजेरी लावत नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ६५ टक्के हजेरी आवश्यक केली आहे. या जून महिन्यांपासून परदेशी विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन महिन्याला मागविली जात आहे. जे विद्यार्थी कॉलेजला पुरेशी हजेरी लावत नाहीत, त्यांना परत पाठविले जात आहे. या वर्षी नोव्हेंबपर्यंत २६० विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले आहे. नियन न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या वर्षी भारतात नवीन चार हजार २०४ विद्यार्थी आले होते. तर, पूर्वी शिकणाऱ्याच सहा हजार विद्यार्थ्यांनी व्हिसाची मुदत वाढवून घेतली होती. यावर्षी नोव्हेंबपर्यंत नवीन ४ हजार ११७ विद्यार्थी आले आहेत. तर, चार हजार विद्यार्थ्यांनी व्हिसाची मुदत वाढवून घेतली आहे. व्हिसाची मुदत वाढवून घेण्याची संख्या घटली असल्याचे आढळून आले आहे. या वर्षी ४५ परदेशी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
आठ वर्षे पीएचडी करणाऱ्यास परत पाठविले
एक परदेशी विद्यार्थी पुण्यात गेल्या आठ वर्षांपासून पीएचडी करीत असल्याची माहिती नागरिकांनी परदेशी नोंदणी कार्यालयास दिली. एखाद्या विषयावर साधारण पाच वर्षे पीएचडी करू शकतो. मात्र, ही व्यक्ती आठ वर्षे पीएचडी करीत असल्यामुळे तिला परत पाठविण्यात आले आहे. परदेशी नागरिक त्यांच्या देशातील आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे परत जाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.
परदेशी विद्यार्थ्यांवर पोलिसांची अशीही नजर
पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षण न घेता हे विद्यार्थी इतरच उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी व्हिसावर आल्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना कोणताही व्यवसाय अथवा नोकरी करता येत नाही. शिक्षणासाठी आलेला एक विद्यार्थी नोकरी करीत असल्याचे त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर समजल्यानंतर त्याला परत पाठविण्यात आले आहे. परदेशी विद्यार्थ्यांचे Social Networking साईटवरील प्रोफाईल, डमडाटा, मोबाईल कॉल रेकॉर्डवर लक्ष ठेवले जात आहे.