दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशूल्क विभागाने ही कारवाई केली.
स्पाईसजेटच्या दुबई-पुणे विमानात सोने आणल्याची माहिती सीमाशूल्क विभागाला मिळाली होती. विमानाची तपासणी केल्यानंतर टॉयलेटमध्ये एका काळ्या रंगाच्या प्लॉस्टिक बॅगेत सोन्याची बिस्किटे आढळून आली. हे सोने कोणी आणले याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती सीमाशूल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
परदेशातून सोने चोरून आणण्यासाठी नेहमी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात जेट एअरवेजच्या विमानाने दुबईहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क विभागाने १ किलो ६३ ग्रॅम सोने जप्त केले होते. हे सोने ट्रॉलीचे चाक आणि हॅन्डलमध्ये लपवले होते. या सोन्याची बाजारभावानुसार ५१ लाख ३५ हजार ६०२ रुपये इतकी किंमत होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सामानाची कसून तपासणी केल्यानंतर सोने सापडले होते.
तर नोव्हेंबर २०१४ मध्ये एका महिलेने अंर्तवस्त्रात चोरकप्पा करून चार किलो सोने आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सीमाशूल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. ही महिला दुबईहून पुण्याला आली होती. सीमाशूल्क अधिकाऱ्यांना संशय आल्याने तपासणी केल्यानंतर अवैधरित्या सोने आणले जात असल्याचे निर्दशनास आले होते. या महिलेने अंर्तवस्त्रात चार किलो वजनाची सोन्याची आठ बिस्किटे लपविली होती. या बिस्किटांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक कोटी ६ लाख ८८ हजार १६० रुपये इतकी होती. याआधीही अशा अनेक घडल्या होत्या. सीमाशुल्क विभागाच्या सतर्कतेमुळे आणखी एक सोने तस्करीचा प्रयत्न अयशस्वी झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 kilo gold seized from spicejets dubai pune aircraft
First published on: 26-10-2016 at 14:54 IST