हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीतात आपल्या सोनेरी स्वराची अमीट मुद्रा उमटवणारे गायक पं. कुमार गंधर्व यांची शैली आणि प्रयोगशीलतेची चिकित्सक नजरेने मांडणी करणारा ग्रंथ रसिकांना वाचायला मिळणार आहे. कुमार गंधर्वाच्या नव्वदाव्या जयंतीच्या निमित्ताने १ आणि २ नोव्हेंबर रोजी पुण्यात आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘कालजयी कुमार गंधर्व’ या दोन खंडांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल.    
देवासचे कुमार गंधर्व प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. १ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सायंकाळी ५ वाजता ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथाचे प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल. ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी, ज्येष्ठ गायिका कलापिनी कोमकली या वेळी उपस्थित राहणार आहेत. प्रकाशनानंतर कुमार गंधर्वाच्या स्वरचित बंदिशींचा ‘गंधर्वस्वर’ हा कार्यक्रम कलापिनी व भुवनेश कोमकली हे सादर करणार आहेत. २ नोव्हेंबरला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सकाळी १० वाजता ‘कुमार गायकीचे अंतरंग’ हा दृकश्राव्य परिसंवाद होणार आहे. अमरेंद्र धनेश्वर, उदयन वाजपेयी आणि सत्यशील देशपांडे या परिसंवादात आपले विचार मांडणार असून पं. शंकर अभ्यंकर या वेळी उपस्थित राहतील. हे दोन्ही कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत.
‘कालजयी कुमार गंधर्व’ ग्रंथाचा पहिला खंड मराठीत, तर दुसरा खंड हिंदी व इंग्रजी असा द्वैभाषिक असून कलापिनी कोमकली व रेखा इनामदार साने यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. यातील मराठी खंडात लक्ष्मणशास्त्री जोशी, रामुभैया दाते, पु. ल. देशपांडे, वसुंधरा कोमकली, विजय तेंडुलकर, श्रुती सडोलीकर काटकर, मुकुल शिवपुत्र आदिंसह २६ विश्लेषकांनी कुमार गंधर्वाच्या गायकीविषयी लिहिले आहे. तर हिंदी व इंग्रजी खंडात यू. आर. अनंतमूर्ती, के. जी. गिंडे, विष्णू चिंचाळकर, शुभा मुदगल, नलिन ढोलाकिया अशा एकूण २८ विश्लेषकांनी मांडणी केली आहे.