जलसंपदा विभागाकडून वाढविण्यात आलेल्या जलदरामुळे महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या खर्चात दरवर्षी ९४ कोटींनी वाढ झाली आहे. महानगरपालिकेला पाणीपट्टीपोटी १०५.६ कोटी रुपये मोजावे लागत होते. नव्या जलदरानुसार महानगरपालिकेला तब्बल २०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच १०० ते १२५ टक्के अतिरिक्त पाणीवापराकरिता अनुज्ञेय दराच्या दीडपट, तर १२५ टक्के पेक्षा जास्त पाणीवापरास अनुज्ञेय दराच्या तिप्पट आकारणी करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाकडून राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना ६.२० ते १२.४० रुपये आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना ४५ ते ९० रुपये वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ जुलैपासून सुरू झालेल्या जलवर्षापासून लागू करण्यात आले आहेत. या दरात सन २०२३-२४ मध्ये दहा टक्के, तर सन २०२४-२५ या जलवर्षासाठी २० टक्के वाढ होणार आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे जलसंपदा विभागाच्या मालकीची आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला पाणीवापरापोटी जलसंपदा विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. आतापर्यंत ही पाणीपट्टी प्रतिवर्षी १०५.६ कोटी रुपये एवढी भरावी लागत होती. नव्या दरानुसार त्यामध्ये ९४.४ कोटींनी वाढ होऊन आता प्रतिवर्षी तब्बल २०० कोटी रुपये पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट पाणी उचलल्यास ५५ पैसे आणि कालव्यातून उचलल्यास १.१० पैसे (प्रति एक हजार लिटर) दर करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकारच्या दरांत अनुक्रमे ३० पैसे आणि ६० पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे. महानगरपालिका दररोज खडकवासला धरणातून १५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पेक्षा जास्त पाणी उचलते. सध्या महापालिकेला ११.८३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीकोटा मंजूर आहे. दरवर्षी महानगरपालिका १६ ते १७ टीएमसीपेक्षाही जास्त पाणी वापरते. त्यामुळे महानगरपालिकेला पाणीपट्टीपोटी जादा रक्कम भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेचा गेल्या आठ वर्षांतील प्रत्यक्ष पाणीवापर
वर्ष प्रत्यक्ष वापर (टीएमसीमध्ये)
२०१३-१४ १५.९५
२०१४-१५ १५.८३
२०१५-१६ १६.५०
२०१६-१७ १६.७१
२०१७-१८ १८.७१
२०१८-१९ १७.०२
२०१९-२० १८.२४
२०२०-२१ १८.३०