पुणे : बिलावरून झालेल्या वादातून गुन्हेगाराचा मद्यालयातील अंगरक्षकाकडून (बाऊन्सर) सराइताच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात घडली. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंगरक्षकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये शेजवाळ आणि त्याचे मित्र गुरुवारी रात्री गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास बिलावरून बारमधील व्यवस्थापक आणि शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. बारमधील अंगरक्षक आणि शेजवाळ यांच्यात हाणामारी झाली. त्यावेळी अंगरक्षकाने शेजारी असलेल्या पंक्चरच्या दुकानातून हातोडी आणली. शेजवाळ याच्या डोक्यात हातोडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – येरवडा कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला महिला पोलीस हवालदाराने पकडले

हेही वाचा – हवाई प्रवाशांवर आता तातडीने उपचार! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यान्वित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेजवाळविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.