जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अभंगांचा समावेश असलेली शके १६५३ मधील दुर्मीळ वही मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे. या वहीमध्ये संत तुकाराम यांचे अभंग तर आहेतच. पण, त्याचबरोबरीने संत नामदेव यांचे अभंगही यामध्ये समाविष्ट आहेत. संत जगनाडे महाराज आणि बाळा जगनाडे या पिता-पुत्राच्या हस्ताक्षरामध्ये या अभंगांचे लेखन हे या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य आहे.

वारकरी संप्रदायासाठी अमनोल ठेवा –

वारकरी संप्रदायासाठी हस्तलिखित स्वरूपातील वही हा अमनोल ठेवा आहे. या हस्तलिखिताचे अक्षर सुवाच्य आहे.  विठ्ठल हा शब्द लिहिताना प्रत्येक ठिकाणी त्यातील ‘वी’ हा दीर्घ करण्यात आला आहे, अशी माहिती जुन्या हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक आणि मराठी हस्तलिखित केंद्राचे संचालक वा. ल. मंजूळ यांनी दिली. 

या वहीमध्ये एक हजार अभंग लिहिलेले आहेत –

मंजूळ म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांचे अभंग संत जगनाडे महाराज उतरवून घेत असत. पुढे संताजी जगनाडे यांची ही वही त्यांचे पुत्र बाळाजी जगनाडे यांच्याकडे आली. संताजी जगनाडे हे सुदुंबरे (ता. मावळ) येथे वास्तव्यास होते. तर, बाळा जगनाडे हे तळेगाव येथे वास्तव्यास होते. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची ही वही ताब्यात आल्यानंतर बाळा जगनाडे यांनी त्या वहीच्या मोकळ्या जागेमध्ये संत नामदेवांचे अभंग लिहिले. या वहीमध्ये एक हजार अभंग लिहिलेले आहेत. त्यामध्ये संत तुकारामांचे साडेसातशे तर संत नामदेवांचे अडीचशे अभंग आहेत. शके १६५३ म्हणजे १७३१ सालामध्ये श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी बाळा जगनाडे यांनी ही वही पूर्ण केली असा या हस्तलिखितावर उल्लेख करण्यात आला आहे.”